Asian Game 2018 : भारताच्या कबड्डी संघात राज्याचे चारच शिलेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:51 PM2018-07-09T16:51:57+5:302018-07-09T16:52:41+5:30
पुढील माहिन्यात सुरू होणा-या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या पुरूष व महिला कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे या संघात उत्तरेतील राज्यांचे वर्चस्व जाणवत आहे.
मुंबई - पुढील माहिन्यात सुरू होणा-या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या पुरूष व महिला कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे या संघात उत्तरेतील राज्यांचे वर्चस्व जाणवत आहे. गेल्या काही वर्षांपासून या मराठमोळ्या खेळातून महाराष्ट्राची पिछेहाट झालेली आहे आणि त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आशियाई स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघांत महाराष्ट्राच्या चारच खेळाडूंना संधी मिळाली आहे, परंतु त्यापैकी एक खेळाडू भारतीय रेल्वेचे प्रतिनिधीत्व करते.
महाराष्ट्राच्या गिरीश इरनाक, रिशांक देवाडीगा यांची पुरुष, तर सायली केरीपाळेची भारतीय महिला संघात निवड . त्याच बरोबर रेल्वेकडून खेळणारी महाराष्ट्राची सोनाली शिंगटेचा देखील महिला संघात समावेश. गिरीश व रिशांक या दोन शिलेदारांची पुन्हा एकदा भारतीय कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे. जकार्ता (इंडोनेशिया) येथे १८ऑगष्ट ते २सप्टेंबर २०१८ या कालावधीत या आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यात कबड्डी स्पर्धा १९ ते २५ऑगष्ट २०१८ या कालावधीत होणार आहेत.
दुबई येथे नुकत्याच झालेल्या मास्टर कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातल्या सुरजित, सुरींदर नाडा,मनजीत चिल्लर यांना आशियाई स्पर्धेतून वगळण्यात आले असून तेलंगणाचा मल्लेश गंगाधरची पुरुष संघात वर्णी लागली आहे . रिशांक व गिरीश यांना दुबईत पाकिस्तान बरोबर झालेल्या पहिल्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. पण त्यानंतर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करीत या दोघांनी आपली निवड सार्थ ठरवली. त्यामुळे भारतीय निवड समितीला त्यांच्या नावाचा विचार करण्यास भाग पाडले.
असे असतील भारतीय संघ
पुरुष : गिरीश इरनाक (महाराष्ट्र), दीपक हुडा (राजस्थान), मोहित चिल्लर (भारतीय रेल्वे), संदीप नरवाल (हरियाणा), प्रदीप नरवाल (उत्तराखंड), गिरीश इरनाक (महाराष्ट्र), मोनू गोयत (सेनादल), अजय ठाकूर हिमाचल प्रदेश), रोहित कुमार सेनादल), राजू लाल चौधरी (राजस्थान), मल्लेश गंगाधर (तेलंगणा), राहुल चौधरी(उत्तर प्रदेश). राखीव :- अमित नांगर (दिल्ली), मनिंदर सिंग (पंजाब).
महिला संघ : साक्षी कुमारी (हरियाणा), कविता, प्रियांका (दोघी हिमाचाल प्रदेश), मनजीत कौर (राजस्थान), पायल चौधरी, रितू नेगी, सोनाली शिंगटे (तिन्ही भारतीय रेल्वे), सायली केरीपाळे (महाराष्ट्र), रणदीप कौर खेरा(पंजाब), शालिनी पाठक (राजस्थान), उषाराणी नरसिंह (कर्नाटक), मधू (दिल्ली), राखीव : प्रियांका (हरियाणा), शमा परवीन (बिहार).