कटु सत्यः आशियाई पदकविजेता खेळाडू दिल्लीत पुन्हा विकतोय चहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 02:53 PM2018-09-08T14:53:26+5:302018-09-08T14:53:47+5:30
जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई करताना सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पदकविजेत्या खेळाडूंना कोट्यवधी बक्षीस देण्याच्या घोषणा झाल्या.
नवी दिल्ली - जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई करताना सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पदकविजेत्या खेळाडूंना कोट्यवधी बक्षीस देण्याच्या घोषणा झाल्या. मात्र, त्यातल्या काही खेळाडूंना आजही पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरीची कामं करावी लागत आहेत. आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेता हरीश कुमार नवी दिल्लीत पुन्हा चहा विक्रीच्या कामाला लागला आहे.
आशियाई स्पर्धेत सेपाकटक्राव या खेळात सांघिक कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात हरीशचा समावेश होता. दिल्लीतील मजनू का टीला येथे आपल्या वडीलांच्या दुकानात हरीश चहा विकण्याचे काम करतो. जकार्ता येथून मायदेशी परतल्यानंतर हरीश पुन्हा आपल्या जुन्या कामाला लागला. चहा विक्रीकरूनच हरीशच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो.
Records broken, history created, hurdles shattered.
— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) September 7, 2018
A tribute to our athletes, who made the impossible possible at #ASIANGAMES2018! May you bring ever greater glory to India! We are proud to stand by you. #KheloIndiapic.twitter.com/ngpfxljaUz
हरीशच्या म्हणण्यानुसार त्याचे कुटुंब मोठं आहे आणि त्या तुलनेत येणारे उत्पन्न कमी आहे. वडीलांना त्यांच्या चहाच्या दुकानात मदत करून हरीश 2 ते 6 वाजेपर्यंत सराव करतो. कुटूंबाच्या उज्वल भविष्यासाठी चांगली नोकरी करण्याची हरीशची इच्छा आहे. चहा विक्री करण्याबरोबरच हरीशचे वडील रिक्षाही चालवतात.