Asian Games 2018: 'सुवर्ण कन्या' विनेशचा साखरपुडा; विमानतळाच्या पार्किंगमध्ये घातली अंगठी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 10:24 AM2018-08-28T10:24:52+5:302018-08-28T10:25:12+5:30
Asian Games 2018: भारताला कुस्तीत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या विनेश फोगाटचा साखरपुडा झाला. जकार्तावरून मायदेशी परतल्यानंतर विमानतळाच्या पार्किंगमध्ये प्रेमी सोमवीर राठीने तिला अंगठी घातली.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताला कुस्तीत सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या विनेश फोगाटचा साखरपुडा झाला. जकार्तावरून मायदेशी परतल्यानंतर विमानतळाच्या पार्किंगमध्ये प्रेमी सोमवीर राठीने तिला अंगठी घातली. विनेशने 50 किलो वजनी गटात जपानच्या युकी इरीला 6-2 असे एकतर्फी सामन्यात पराभूत करताना सुवर्णपदक जिंकले. आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
इंडोनेशीयातून शनिवारी मायदेशात परतल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवीरने विनेशला अंगठी घालून साखरपुडा उरकला. विमानतळावर स्वागतासाठी तिच्या गावातील असंख्य लोकं तिथे आले होती. पार्किंगच्या बाहेर विनेश आणि सोमवीर यांनी साखरपुड्याच्या सर्व विधीही केल्या. शनिवारी तिचा वाढदिवसही होता आणि विमानतळावरच केक कापण्यात आला. यावेळी विनेशची आई आणि सोमवीरचे नातेवाईकही उपस्थित होते.
साखरपुड्याच्या या वृत्ताला दुजोरा देताना विनेशने लवकरच विवाह करणार असल्याचे सांगितले. तिचे काका महावीर फोगाट म्हणाले की, मुलं आता समजुतदार झाले आहेत आणि आम्ही त्यांचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे.