Asian Games 2018: ...अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 05:51 AM2018-08-23T05:51:59+5:302018-08-23T05:52:20+5:30
'राही’च्या सुवर्णवेधाचा जल्लोष; सुवर्णमयी आठवणी पुन्हा जाग्या
-सचिन भोसले
कोल्हापूर : राजारामपुरी येथील राही सरनोबतच्या घरी बुधवारी सकाळपासून सरनोबत कुटुंबीयांमध्ये हुरहुर होती. सगळ्यांचे डोळे घड्याळाकडे लागले होते; कारण दुपारी राहीचा आशियाई स्पर्धेतील २५ मीटर पिस्टलमधील क्रीडाप्रकार होता. अखेर ती वेळ आली... त्यात थायलंडच्या नफस्वॅन यांगपाईबुन हिच्याबरोबर झालेली अटीतटीची लढतीत तिने सुवर्णपदक जिंकताच घरात एकच जल्लोष झाला. दूरचित्रवाणीवर राष्ट्रगीताची धून लागली तशी राहीची आई प्रभा यांना आनंदाश्रू लपविता आले नाहीत. यंदाच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णवेध घेणारी ‘राही’ ही पहिली भारतीय नेमबाज ठरली.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राहीच्या राजारामपुरी येथील घरी जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतील २५ मीटर पिस्तल प्रकारातील स्पर्धा होणार होती. त्यामुळे सकाळी अकरा वाजल्यापासून तिच्या घरी काका राजेंद्र सरनोबत, काकी कुंदा सरनोबत, आजी वसुंधरा, आत्या वनिता उत्तुरे, कुटुंबीयांचे स्नेही दिलीप कदम व त्यांच्या पत्नी सुनीता यांच्यासह अन्य नातेवाइकांनी हजेरी लावली. दुपारी दोन वाजल्यापासून सर्वजण दूरचित्रवाणीसमोर बसलेले होते. राहीची स्पर्धा सुरू झाली. थायलंडच्या नफस्वॅन यांगपाईबुन व राहीच्या अगदी ३४-३४ अशी समान गुणसंख्या झाली होती. त्यामुळे कुटुंबीयांंची आणखी घालमेल झाली.
दोघींमध्ये समान गुण झाल्याने ‘शुट आॅफ’चा आधार घेण्यात आला. त्यातही पुन्हा समान गुण झाले. पुन्हा आणखी शुट आॅफ सुरू झाले. त्यात तिने पाचपैकी चार अचूक वेध घेत सुवर्ण निश्चित केले अन् घरातल्यांच्या उत्साहाला पारावर उरला नाही.
आजी वसुंधरा, आई प्रभा यांना आनंदाश्रू लपवता आले नाहीत. राहीच्या या सुवर्णमय कामगिरीनंतर सरनोबत कुटुंबीयांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली.
अडीच वर्षांपूर्वी हाताला झालेल्या दुखापतीनंतर तिने सुवर्ण कामगिरी केली आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पुनरागमन केले आणि देशाच्या आणि कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा खोवला आहे.
- जीवन सरनोबत, राहीचे वडील
सकाळपासून आमच्यावर दबाव होता. दुपारी तिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर राष्ट्रगीताचा धून वाजली तशी माझ्या मनात आणखी ऊर भरून आला. त्यात तिने इंडोनेशियाला जाताना सुवर्णपदक घेऊनच येते, असे सांगितले होते. त्याप्रमाणे तिने शब्द खरे करून दाखविले.
- प्रभा सरनोबत, राहीच्या आई
काही दिवसांपूर्वी राहीचा बायोडाटा तयार करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे मी तिला पुणे येथे फोन करून नवीन फोटो हवा आहे, असे सांगितले. त्यावर तिनेही ‘अरे दादा, मी एशियाडमध्ये सुवर्णपदक घेऊन आले की, नवीन बायोडाटा तयार कर,’ असे सांगितले होते; त्यामुळे ती जशी बोलली तशी तिने कामगिरी करून देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.
- आदित्य सरनोबत, राहीचा भाऊ
जिद्द आणि सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी यामुळे तिने पुन्हा सुवर्णवेध घेतला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे पुन्हा एकदा ती आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरेल.
- अजित पाटील, राहीचे स्थानिक नेमबाज प्रशिक्षक