Asian Games 2018: दीपिकाला डास चावल्याने भारताचे पदकं हुकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 11:17 AM2018-08-16T11:17:46+5:302018-08-16T11:32:08+5:30
Asian Games 2018: आशियाई स्पर्धेला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबई - आशियाई स्पर्धेला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या स्पर्धेतील भारतासाठी पदकाचे आशास्थान असलेल्या तिरंदाज दीपिका कुमारीला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दीपिका बुधवारी संघासोबत जकार्ताला जाऊ शकली नाही. गत आठवड्यात तिला डेंग्यूचा ताप आला होता आणि त्यातून ती पूर्णपणे बरी झालेली नाही.
दीपिकाची प्रकृती सुधारल्यास ती शुक्रवारी जकार्ताला रवाना होण्याची शक्यता आहे. तिरंदाजीची स्पर्धा 22 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तोपर्यंत दीपिकाच्या प्रकृतीत सुधारण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. रिकर्व्ह प्रकाराच्या जागतिक क्रमावारीत दीपिका सध्या सातव्या स्थानावर आहे आणि 2010 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने भारतीय रिकर्व्ह संघासोबत कांस्यपदकाची कमाई केली होती.
जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानावर असलेल्या दीपिकाच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन सुवर्णपदकं आहेत. त्याशिवाय तिने विश्वचषक स्पर्धेतील तीन सुवर्णपदकही जिंकली आहेत. पाच वर्षांनंतर पुनरागमन करताना दीपिकाने गतवर्षी सॉल्ट लेक शहरात विश्वचषक स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले होते.
2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्या स्पर्धेतही तिला ताप आला होता आणि त्याचा परिणाम कामगिरीवर झालेला पाहायला मिळाला. 2016च्या रिओ स्पर्धेतही ती सहभागी झाली होती, परंतु तिला पदक जिंकता आले नव्हते.