Asian Games 2018 : १०० मीटरमध्ये दुती चंदला रौप्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 06:12 AM2018-08-27T06:12:14+5:302018-08-27T06:12:46+5:30
Asian Games 2018 :भारताची स्टार धावपटू दुती चंदने रविवारी १८ व्या आशियाई गेम्समध्ये महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत रौप्यपदक पटकावत या स्पर्धेत २० वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले.
जकार्ता : भारताची स्टार धावपटू दुती चंदने रविवारी १८ व्या आशियाई गेम्समध्ये महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत रौप्यपदक पटकावत या स्पर्धेत २० वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. सातव्या क्रमांकाच्या लेनमध्ये धावतान दुतीने ११.३२ सेकंदाची वेळ नोंदवली. तिचा राष्ट्रीय विक्रम ११.२९ सेकंद वेळेचा आहे. बहरिनच्या ओडियोंग एडिडियोंगने ११.३० सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले, तर चीनची वेई योंगलीने ११.३३ सेकंद वेळेसह कांस्यपदकाचा मान मिळवला.
ओडिशाची २२ वर्षीय दुती कारकिर्दीत प्रथमच आशियाई गेम्समध्ये सहभागी झाली आहे. आयएएएफने २०१४ मध्ये आपल्या हायपरएंड्रोगोनिजम नीतीनुसार तिला निलंबित केले होते, पण क्रीडा लवादामध्ये अपील केले आणि या प्रकरणात विजय मिळवत पुनरागमन केले. तिच्या या कामगिरीमुळे ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तिला ५0 लाखांचे रोख पारितोषिक घोषित केले. भारताने आशियाई गेम्समध्ये १०० मीटर महिला दौड स्पर्धेत यापूर्वी १९९८ मध्ये पदक पटकावले होते. त्यावेळी रिचा मिस्त्री कांस्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरली होती.
मला विश्वास वाटत नाही, वाटला तेव्हा मला सिल्व्हर पदक भेटले. मला नंतर समझले की, अगदी थोडक्यात सुवर्णपदक हुकले. तरीपण मी खूप खूष आहे. आशियाई गेम्सच्या अंतिम सामन्यामध्ये मी पोहोचेन मला असे वाटले नव्हते. ११.३२ वेळ माझ्यासाठी चांगली आहे. ३२ वर्षांअगोदर १९८६ मध्ये पी. टी. उषाने सिल्व्हर पदक प्राप्त केले होते, त्याची मी पुनरावृत्ती केली. मी सुरुवात चांगली होण्यावर भर देत होते. आज माझा दिवस होता म्हणून मी सिल्व्हर पदक जिंकू शकले. - दूती चंद