Asian Games 2018: दीपिकाने पदक जिंकले, कार्तिकचे कौतुक झाले, नेटिझन्स भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 09:39 AM2018-08-28T09:39:31+5:302018-08-28T09:42:04+5:30
Asian Games 2018: स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले. दीपिकाचे आशियाई स्पर्धेतील एकेरीतील हे दुसरे कांस्यपदक आहे.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले. दीपिकाचे आशियाई स्पर्धेतील एकेरीतील हे दुसरे कांस्यपदक आहे. तिने 2014मध्येही कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होणे साहजिकच होते. पण ते कौतुक करताना एका इंग्रजी वेबसाईटने त्याचे श्रेय कुणा दुसऱ्यालाच दिले आणि मग सोशल मीडियावर टीकांचा पाऊस पडला.
This one is special ! To my parents , my in laws, my husband , family , coaches and friends - This one is for you. Thank you for believing in me even when I doubted myself. This 🥉 belongs to all of you ! #AsianGames18pic.twitter.com/wvscqmhY9N
— Dipika Pallikal (@DipikaPallikal) August 26, 2018
दीपिकाला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अव्वल मानांकित मलेशियाच्या निकोल डेव्हीडने 3-0 अशा फरकाने दीपिकाला पराभूत केले. दीपिका ही 2014च्या आशियाई स्पर्धेत एकेरीत पदक जिंकणारी एकमेव भारतीय होती. आशियाई स्पर्धेतील दीपिकाचे हे सलग चौथे पदक आहे.
दीपिकाने कांस्यपदक जिंकले आणि त्याचे कौतुक करताना इंग्रजी वेबसाईटने क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या पत्नीने आशियाई स्पर्धेत पदक जिंकले असा उल्लेख केला. मग काय सोशल मीडियावर टीकांचे बाण सुटले. हे पदक दीपिकाने स्वकर्तुत्वावर जिंकले आहे, कार्तिकमुळे नाही, असे अनेक टीकांचे मॅसेज त्या वेबसाईटवर पडू लागले.