Asian Games 2018: एका रात्रीत कुणी स्टार बनत नाही... शार्दुल विहानची यशोगाथा वाचून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:05 PM2018-08-24T16:05:00+5:302018-08-24T16:05:42+5:30
विहानची ही मेहनत माजी नेमबाज आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी ' विहान हा एका दिवसात स्टार झालेला नाही. यामागे त्याची कठोर मेहनत आहे,' असे म्हटले आहे.
नवी दिल्ली : त्याचे वय 15... हे वय मजा मस्ती करण्याचं, असं आपण समजतो... पण या वयात त्याला झपाटलं होतं ते एका खेळाने. त्यासाठी तो दररोज करत होता तब्बल 240 किलोमीटरचा प्रवास. या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. अशियाई स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावलं आणि तो हिरो झाला. पण एका रात्रीत कुणीही स्टार बनत नाही, हीच गोष्ट विहानची यशोगाथा वाचल्यावर आपल्याला कळू शकेल.
शार्दुल विहान मेरठला राहणारा. पण तिथे खेळाच्या सरावासाठी सुविधा नाही. त्यामुळे त्याला दररोज मेरठ ते दिल्ली असा 240 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे विहानची दिनचर्या पाहिली तर त्याचे कष्ट तुम्हाला कळू शकेल. आशियाई स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात विहानने रौप्यपदक पटकावले होते.
विहान सकाळी चार वाजता मेरठहून निघतो. यावेळी त्याचे काका धर्मेंद्र शर्मा आणि ड्रायव्हर त्याच्यासोबत असायचे. दिल्लीला जाऊन दिवसाला 8 तास तो सराव करायचा. विहानची ही मेहनत त्याचे काका पाहत होते. त्यामुळेच जेव्हा विहानला रौप्यपदक मिळालं तेव्हा त्याच्या काकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. विहानची ही मेहनत माजी नेमबाज आणि क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी ' विहान हा एका दिवसात स्टार झालेला नाही. यामागे त्याची कठोर मेहनत आहे,' असे म्हटले आहे.