Asian Games 2018: भोकनाळ स्कल्सच्या अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 05:30 AM2018-08-22T05:30:42+5:302018-08-22T05:30:46+5:30
भारतीय नौकायनपटू दत्तू भोकनाळ १८ व्या आशियाई गेम्समध्ये नौकायन स्पर्धेत पुरुष एकेरी स्कल्समध्ये अंतिम फेरीत दाखल झाला.
पालेमबांग : भारतीय नौकायनपटू दत्तू भोकनाळ १८ व्या आशियाई गेम्समध्ये नौकायन स्पर्धेत पुरुष एकेरी स्कल्समध्ये अंतिम फेरीत दाखल झाला. त्याचसोबत पुरुष लाईटवेट फोर संघाने अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. भोकनाळने पुरुष एकेरी स्कलच्या रेपेचेज फेरीत ७ मिनिट ४५.७१ सेकंदच्या वेळसह आपल्या हिटमध्ये अव्वल स्थान पटकावताना अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. भोपाल सिंग, जगवीर सिंग, तेजस शिंदे आणि प्रणय नौकरकर यांचा समावेश असलेल्या पुरुष लाईटवेट फोर संघाने आपल्या हिटमध्ये दुसरे स्थान पटकावले. टीम रेपेचेज हिटमध्ये ६ मिनिट ५१.८८ सेकंद वेळेसह अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. फायनल २३ आॅगस्टला होईल.
दीपिका १७ व्या स्थानी
दहाव्या सेटमध्ये खराब शॉटमुळे दीपिका कुमारी वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत १७ व्या स्थानी राहिली, तर महिला संघ सातव्या स्थानी राहिला. दीपिकाने पहिल्या हाफमध्ये चमकदार कामगिरी करत आठवे स्थान पटकावले, पण दहाव्या सेटमध्ये खराब शॉटमुळे तिला अव्वल १० मध्ये स्थान मिळवता आले नाही. दीपिकाने १० व्या सेटमध्ये केवळ १९ गुण नोंदवले. त्याआधी, तिने सलग २८ ते ३० दरम्यान स्कोअर नोंदवला होता. दीपिकाने एकूण ६४९ गुण मिळवले. प्रमिला दाइमेरी ६४२ गुणांसह २१व्या व अंकिता भकद ६१७ गुणांसह ३६ व्या स्थानी राहिली. लक्ष्मीराणी मांझी ६६ तिरंदाजांमध्ये ४४ व्या स्थानी राहिली. भारतीय संघ १९०८ च्या स्कोअरसह सातव्या स्थानी राहिला. (वृत्तसंस्था)