Asian Game 2018: टेबल टेनिसपटूंसाठी हीच सुवर्ण संधी!
By स्वदेश घाणेकर | Published: August 18, 2018 01:30 PM2018-08-18T13:30:33+5:302018-08-18T14:54:46+5:30
Asian Game 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख चढ उतारांचा राहिला आहे. 2014 मध्ये इंचाँन येथे भारताने एकूण 57 पदक जिंकली होती.
मुंबई - आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख चढ उतारांचा राहिला आहे. 2014 मध्ये इंचाँन येथे भारताने एकूण 57 पदक जिंकली होती. 1982 नंतर दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूंनी 57 पदकांचा आकडा गाठला. 2010च्या तुलनेत हा आकडा 8 पदकांनी कमी झाला असला तरी सुवर्णपदकात भारताने 2010च्या तुलनेत दोन पदकं अधिकची जिंकली होती. 1958 ते 2014 या कालावधीत भारताने एकूण 616 पदके जिंकली, परंतु त्यात एकही पदक हे टेबल टेनिसपटूंना पटकावता आलेले नाही. पण, यंदा ही उणीव भरून निघण्याची चिन्हे आहेत.
मनिका बत्रा, अचंता शरथ कमल, साथियन ग्यानसेकरन, मौमा दास यांच्याकडून यंदा पदकांच्या अपेक्षा आहेत. या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक भरारी घेतली आहे आणि म्हणूनच सुवर्ण नाही, निदान कांस्यपदक तरी त्यांच्याकडून अपेक्षित आहे. 1958 सालापासून आशियाई स्पर्धेत टेबल टेनिसचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन स्पर्धा वगळता चीननेच या क्रीडा प्रकारात हुकुमत गाजवली आहे आणि यंदाही त्यांचाच दबदबा राहणार आहे.
भारताला केवळ एखादे पदक पटकावून पदकाचा दुष्काळ संपवायचा आहे. भारतीय खेळाडूंनी गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे, परंतु त्याचे रूपांतर आशियाई पदकांमध्ये करणे, थोडेसे अवघडच आहे. पण, राष्ट्रकुलमधील पदकांनी भारतीय खेळाडूंचे मनोबल प्रचंड उंचावलेले आहे आणि त्याच जोशात त्यांच्याकडून एखाद्या पदकाची लॉटरी लागू शकते. 23 वर्षीय मनिका बत्राने आपल्या कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे आणि सा-यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. गोल्ड कोस्टमध्ये सर्वाधिक चार पदकं जिंकणारी ती एकमेव भारतीय होती. तिने महिला सांघिक व एकेरीत सुवर्ण, महिला दुहेरीत रौप्य आणि मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूकडून अशी कामगिरी झाली नव्हती.
टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू शरथ कमल हाही कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे 36 वर्षीय कमल शेवटच्या आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारतीय पुरूष टेबल टेनिसपटूंमध्ये सर्वाधिक यशस्वी खेळाडू म्हणून तो आघाडीवर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील चार सुवर्ण, दोन कांस्य व एक सुवर्ण अशी एकूण सात पदकं जिंकली आहेत. पण, तीन आशियाई स्पर्धांमध्ये त्याला एकही पदकं न जिंकल्याची खंत असेलच आणि जकार्ता येथे भरून काढण्याचा तो नक्की प्रयत्न करेल.
याआधीच्या तुलनेत भारतीय टेबल टेनिसपटूंचा हा चमू अधिक प्रभावी आहे. पण म्हणून त्यांच्याकडून थेट सुवर्णपदकाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. पण, या संघातील युवा खेळाडूंचा भरणा पाहता त्यांच्यासाठी जकार्तातील अनुभव पुढील वाटचालीसाठी फायद्याचा ठरणारा आहे. कमलचा अनुभव आणि अन्य खेळाडूंचा युवा जोश याची योग्य सांगड घालून भारतीय संघ यंदा करिष्मा दाखवतील, हा भाबडा विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही.