Asian Games 2018: ग्लोजविना सराव करून त्याने जिंकले सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 04:29 PM2018-09-03T16:29:42+5:302018-09-03T16:31:53+5:30
Asian Games 2018: घरात पैसा नसला तरी जिद्द, चिकाटी होती. ग्लोव्ज घ्यायला पैसे नव्हतेच. त्यामुळे त्याने ग्लोव्जविना सराव करायला सुरुवात केली. कधी हाताला फोड यायचे, तर कधी हाताने कोणतेच काम करायला जमायचे नाही. पण तरीही त्याने सराव चुकवला नाही.
नवी दिल्ली, आशियाई क्रीडा स्पर्धा : घरी अठरा विश्व दारीद्र्य... फक्त एक एकराची शेती. त्यामध्ये गहू आणि बाजरी लावली जायची. उत्पन्न काही जास्त नव्हतं. शेतात पिकवलं तरी घरी दोन वेळी अन्न पुरेसं मिळायचं, असं नाही. त्याच्या भावाला बॉक्सिंगचं वेड होतं. त्याने बॉक्सिंग खेळायला सुरुवातही केली होती. पण बिकट परिस्थितीमुळे त्याचे हात शेतात राबायला लागले. बॉक्सिंग सुटली. पण आपल्या मोठ्या भावाचे स्वप्न त्याने साकार करायचे ठरवले. घरात पैसा नसला तरी जिद्द, चिकाटी होती. ग्लोव्ज घ्यायला पैसे नव्हतेच. त्यामुळे त्याने ग्लोव्जविना सराव करायला सुरुवात केली. कधी हाताला फोड यायचे, तर कधी हाताने कोणतेच काम करायला जमायचे नाही. पण तरीही त्याने सराव चुकवला नाही. अशा बिकट परिस्थितीमधून तो थेट जकार्ताला पोहोचला आणि सुवर्णपदक पटकावून त्याने देशाची मान अभिमानाने उंचावली. अमित पंघल, हे त्याचे नाव आता क्रीडा क्षेत्रात सर्वांनाच परिचीत झाले आहे.
अमितला बॉक्सिंग खेळता यावी, यासाठी त्याचा मोठा भाऊ अजयने भरपूर मेहनत घेतली. फक्त शेती करून अमितचा खर्च भागणार नाही, हे त्याला ठाऊक होते. त्यामुळेच त्याने 2011 सालापासून नोकरी करायला सुरुवात केली. या नोकरीतून मिळणारे पैसे तो अमितच्या बॉक्सिंगसाठी वापरत होता.
" अमित बॉक्सिंग करत असताना त्याचे ग्लोव्ज एकदा फाटले होते. त्या ग्लोव्जने सराव होऊ शकत नव्हता. नवीन ग्लोव्ज घेण्यासाठी पैसे नव्हते. स्पर्धा जवळ येत होती. पण तरीही अमितकडे ग्लोव्ज नव्हते. पण तरीही त्याने सरावामधमध्ये कसलीही कमी केली नाही. हातांना त्रास होत असला तरी त्याचा सराव सुरुच होता," असे अजयने सांगितले.