Asian Games 2018: भारताचा पाकिस्तानवर शेवटच्या सेकंदात विजय, हँडबॉलमध्ये एक पाऊल पुढे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 02:16 PM2018-08-24T14:16:21+5:302018-08-24T14:17:30+5:30

Asian Games 2018: हँडबॉल क्रीडा प्रकारात भारत आणि पाकिस्तान हे संघ गट-३ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस होती.

Asian Games 2018: India beat Pakistan in Handball | Asian Games 2018: भारताचा पाकिस्तानवर शेवटच्या सेकंदात विजय, हँडबॉलमध्ये एक पाऊल पुढे 

Asian Games 2018: भारताचा पाकिस्तानवर शेवटच्या सेकंदात विजय, हँडबॉलमध्ये एक पाऊल पुढे 

googlenewsNext

जकार्ताः भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील कुठलाही सामना हा थरारक, उत्कंठावर्धकच असतो, याची प्रचिती आज इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत आली. हँडबॉल क्रीडा प्रकारात अटीतटीच्या सामन्यात भारतानेपाकिस्तानचा अक्षरशः शेवटच्या सेकंदात २८-२७ अशा फरकाने पराभव केला. 

भारत आणि पाकिस्तान हे संघ गट-३ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस होती. प्रत्यक्ष सामन्यादरम्यान ती क्षणाक्षणाला वाढत गेली. कधी भारताची आघाडी, तर कधी पाकिस्तानची, अशी अटीतटी संपूर्ण सामन्यात रंगली. आधी ५-२ अशी आघाडी घेणाऱ्या पाकिस्तानशी भारतानं ५-५ अशी बरोबरी केली. पण त्यानंतर पुन्हा पाकिस्ताननं सरशी केली. त्यांचा पाठलाग करत भारतानं त्यांना १० गोल्सवर गाठलं आणि नंतर मागेही टाकलं. त्यानंतर बरोबरी - आघाडीचा हा खेळ शेवटपर्यंत सुरू राहिला. शेवटच्या मिनिटांमध्ये भारतानं २७-२५ अशी आघाडी घेतली होती, पण पाकनं लागोपाठ दोन गोल करून ती भरून काढली.  त्यामुळे भारतीय चाहत्यांची धडधड वाढली. भारतीय संघानं टाइमआउट घेतला आणि शेवटच्या सेकंदाला पुनियानं गोल करून विजय साकारला.

मलेशियाविरुद्धच्या पहिला सामना भारतानं ४५-१९ असा जिंकला होता. पाकिस्तानविरुद्ध त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. पण सलग दुसरा सामना जिंकून त्यांनी पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. 

Web Title: Asian Games 2018: India beat Pakistan in Handball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.