Asian Games 2018: भारताला उज्ज्वल भविष्याची आशा; स्पर्धेच्या इतिहासात यंदा केली सर्वोत्तम कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 12:15 AM2018-09-03T00:15:19+5:302018-09-03T07:34:58+5:30
गेल्या दोन आठवड्यांमध्ये जगातील दुसऱ्या सर्वांत मोठ्या स्पर्धेत मिळवलेले यश बघता भारताला उज्ज्वल भविष्याची आशा आहे.
जकार्ता : गेल्या दोन आठवड्यांमध्ये जगातील दुसऱ्या सर्वांत मोठ्या स्पर्धेत मिळवलेले यश बघता भारताला उज्ज्वल भविष्याची आशा आहे.
भारताने राष्ट्रकुल स्पर्धेनंतर २०१८ आशियाई गेम्समध्ये पदकांच्या संख्येचा विचार करता सर्वोत्तम कामगिरी करताना एक पाऊल पुढे टाकले आहे. आॅलिम्पिकनंतर दुसºया क्रमांकाची मान्यता असलेल्या या स्पर्धेत भारताने यापूर्वी कधीच एवढी चांगली कामगिरी केलेली नव्हती. जकार्ता व पालेमबांग येथून परतलेल्या पदकविजेत्यांची ही उपलब्धी शानदार आहे. पोडियमवरील स्थान वाढल्यामुळे क्रिकेटला धर्म मानणाºया या देशात आॅलिम्पिक खेळाप्रति उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे. खेळाडूंनी देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. त्यात युवा सौरभ चौधरीपासून ६० वर्षांचे प्रणब बर्धन यांचा समावेश आहे. दरम्यान, भारताला कबड्डी व हॉकी या खेळांमध्ये धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले. भारताने एकूण ६९ पदके पटकावली. त्यात १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३० कांस्य पदकांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी भारताने इंचियोनमध्ये ६५ पदके पटकावली होती.
भारताने १९५१ मध्ये पहिल्या स्पर्धेत पटकावलेल्या १५ सुवर्णपदकांची बरोबरी साधली, पण भारताला यापूर्वी कधीच २४ रौप्य पदके पटकावता आलेली नव्हती. एकूण विचार करता भारताने अव्वल १० मध्ये स्थान कायम राखताना पुन्हा एकदा आठवे स्थान पटकावले. अनेक देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेत वाद होत असतात. यावेळीही काही वेगळे घडले नाही.
स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर मात्र खेळाडू आणि त्यांची कामगिरी याचीच चर्चा होत असते. ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धा भारतासाठी सर्वाधिक पदके मिळवून देणारा खेळ ठरला. त्यात भारताने गेलोरा बंग कर्णो स्टेडियममध्ये १५ पैकी ७ सुवर्णपदके पटकावली. तेजिंदर पाल सिंग तूरने येथे २०.७५ मीटरच्या विक्रमासह अॅथ्लेटिक्समध्ये पहिले पदक मिळवून दिले तर पायाला १२ बोटे असलेल्या स्वप्ना बर्मनने ऐतिहासिक कामगिरी केली. ती सुवर्णपदक पटकावणारी भारताची पहिली हेप्टाथलिट ठरली.
दुती चंदने ट्रॅकवर शानदार पुनरागमन केले आणि दोन रौप्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरली. त्यात १०० मीटरमध्ये भारताने २० वर्षांनंतर प्रथमच पदक पटकावले. जर आफ्रिकेत जन्मलेले खेळाडू कतार व बहरीन या देशांचे प्रतिनिधित्व करू शकले नसते तर भारताची सुवर्णपदकांची संख्या आणखी वाढू शकली असती. त्यामुळे हिमा दासला २०० मीटरमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कारण ती नायजेरियात जन्मलेल्या सलवा ईद नासरच्या तुलनेत पिछाडीवर राहिली.
नीरज चोप्राने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला. धावपटू मंजित सिंग व जिनसन जॉन्सन यांनीही चमकदार कामगिरी केली. भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू वैयक्तिक पदक पटकावून देशाची ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवली. सिंधूला रौप्य आणि सायनाला कांस्य पदक, तसेच टेबल टेनिस सांघिक स्पर्धेत दोन ऐतिहासिक कांस्य पदक भारताच्या मोहिमेत महत्त्वाचे ठरले. भारताच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीनंतर मनिका बत्रा निश्चितच टेबल टेनिसमध्ये स्टार होती, पण जकार्तामध्ये सांघिक स्पर्धेत चीन व जपान या दिग्गज देशांसह दोन कांस्यपदक पटकावणे मोठे यश आहे. या कामगिरीसाठी मनिका, अचंत शरत कमल, जी साथियान आणि हरमित देसाई प्रशंसेस पात्र आहेत.
पालेमबांगमध्ये १६ वर्षीय सौरभ आणि १५ वर्षीय शार्दुल विहान यांनी भारतात प्रतिभेची उणीव नसल्याचे सिद्ध केले, पण अन्य युवा मनू भाकर व अनिष भानवाला हे अपयशी ठरल्यामुळे निराश झाले असतील.
ब्रिजमध्ये बर्धन व शिबनाथ डे सरकार यांनी दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि हा खेळ म्हणजे जुगार नसून बुद्धीचा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. बॉक्सिंगमध्ये हरियाणाच्या अमित पांघलने सुवर्णपदकाला गवसणी घातली. सेनादलाच्या या बॉक्सरने विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियनचा पराभव करीत शानदार विजय नोंदवला. रिकर्व्ह तिरंदाजीतील लाजिरवाण्या कामगिरीमुळे सर्वांना निराश केले, पण त्यांच्या कम्पाऊंड सहकाºयांनी तिरंदाजी पथक रित्या हाताने परतणार नसल्याची खबरदारी घेतली.
कबड्डीत मात्र भारताच्या पुरुष व महिलांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या दोन्ही विभागात भारताच्या हातातून सुवर्ण गेले. दुसरीकडे, पुरुष व महिला हॉकी संघ आशियामध्ये अव्वल स्थानांवर होते. दोन्ही संघांकडून सुवर्णपदकांची अपेक्षा होती.
पण महिलांना रौप्य तर पुरुषांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. साखळी फेरीत ७० पेक्षा अधिक गोल नोंदवणाºया भारतीय पुरुष हॉकी संघाची आगेकूच रोखणे अशक्य भासत होते, पण मलेशियाने त्यांना पराभूत केले. महिला संघ अंतिम फेरीत जपानविरुद्ध पराभूत झाला. (वृत्तसंस्था)