Asian Games 2018: भारतीय अॅथलेटिक्सची तिसरी सर्वोत्तम कामगिरी, सुवर्णपदकांचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 09:22 AM2018-08-31T09:22:16+5:302018-08-31T09:24:53+5:30
Asian Games 2018: भारतीय अॅथलेटिक्सपटूंची आशियाई स्पर्धेतील मोहीम सात सुवर्ण, 10 रौप्य आणि दोन कांस्यपदकांनी संपली. ट्रॅक अॅण्ड फिल्ड स्पर्धेच्या अखेरच्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले.
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारतीय अॅथलेटिक्सपटूंची आशियाई स्पर्धेतील मोहीम सात सुवर्ण, 10 रौप्य आणि दोन कांस्यपदकांनी संपली. ट्रॅक अॅण्ड फिल्ड स्पर्धेच्या अखेरच्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकले. भारतीय अॅथलेटिक्सपटूंची ही आशियाई स्पर्धेतील तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी भारतीय अॅथलेटिक्सपटूंनी 1951 मध्ये 34 ( 10 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य) आणि 1982 मध्ये 21 (4 सुवर्ण, 9 रौप्य व 8 कांस्य) पदकांची कमाई केली होती आणि या दोन्ही स्पर्धा नवी दिल्ली येथे झाल्या होत्या. त्यामुळे जकार्तात भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी ही परदेशातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
भालाफेकीतील पहिलेच सुवर्ण
नीरज चोप्राने ( 88.06 मीटर) आशियाई स्पर्धेत भारताला भालाफेकीतील पहिलेच सुवर्णपदक जिंकून दिले. 1982 मध्ये भारताच्या गुरतेज सिंग यांना कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले होते.
1952 नंतर पहिल्यांदाच सुवर्ण दौड
जिन्सन जॉन्सनने ( 3:44.72 से.) 1500 मीटर शर्यतीत जिंकलेले सुवर्ण हे 1952नंतरचे या क्रीडा प्रकारातील पहिले सुवर्णपदक आहे. निक्का सिंग यांनी 1952च्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते. 1998 च्या स्पर्धेनंतर 1500 मीटरमध्ये पदक जिंकणारा जॉन्सन हा पहिलाच खेळाडू आहे.
उषाच्या पावलावर द्युतीची वाटचाल
पी. टी. उषा यांच्यानंतर एकाच आशियाई स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीत पदक जिंकण्याचा मान द्युती चंदने पटकावला. द्युतीने दोन्ही प्रकारात रौप्यपदक नावावर केले.
मनजिंत सिंगने सर्वांना धक्का दिला
मनजित सिंगने ( 1:46.15 मी.) भारताचा आशियाई स्पर्धेतील 800 मीटर शर्यतीतील सुवर्ण दुष्काळ संपवला. 1982च्या आशियाई स्पर्धेत चार्ल्स बोरोमेओ यांनी 800 मीटरचे सुवर्ण जिंकले होते.
बर्मनची स्वप्नपूर्ती
हेप्टॉथ्लॉन स्पर्धेत भारताच्या स्वप्ना बर्मनने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात सुवर्ण जिंकणारी ती पहिलीच खेळाडू ठरली. यापूर्वी सोना बिस्वास ( रौप्य ) आणि जेजे सोभा ( कांस्य ) यांनी 2002 मध्ये, तर प्रमिला अयप्पा ( कांस्य) यांनी 2010 मध्ये पदक जिंकले होते.
Have become an even bigger admirer of Swapna Barmam after coming to know of the struggles she had to go through. 6 toes in each leg, bandaged jaw, father a rickshaw puller and countless struggles. This is her mother watching her win the Gold on television, thanking the almighty pic.twitter.com/GNBVPw1kDO
— Virender Sehwag (@virendersehwag) August 30, 2018
पाचपैकी पाच
भारताच्या महिला धावपटूंनी 4 बाय 400 मीटर शर्यतीत सलग पाचवे सुवर्णपदक नावावर केले. हिमा दास, एम आर पुवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया वेल्लूवा कोरोथ यांचा समावेश असलेल्या 4 बाय 400 मीटर रिले संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक नावाव केले. हिमा आणि पुवम्मा यांचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले. याआधी हिमाने 400 मीटर शर्यतीत रौप्य, तर पुवम्माने 4 बाय 400 मीटर मिश्र रिले संघाचे रौप्य जिंकले होते.
तूर डी जकार्ता
भारताचा गोळाफेकपटू तेजिंदर पाल तूरने जकार्तात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने 2002 नंतर भारताला आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीचे पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.