Asian Games 2018: कुएलो जोडीकडून भारताला मोठ्या अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 08:42 PM2018-08-19T20:42:14+5:302018-08-19T20:44:15+5:30
आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव गोमंतकीय : कात्या, ड्वेन विंडसर्फिंगसाठी सज्ज
सचिन कोरडे : समुद्रात वाºयाच्या वेगाशी स्पर्धा करीत अंतर गाठणे म्हणजे विंडसर्फिंग. हा खेळ अत्यंत हिमतीचा आणि आव्हानात्मक मानला जातो. या खेळात गेल्या अनेक वर्षांपासून यशोशिखर गाठणारी कुएलो बंधू-भगिनीची जोडी इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. या जोडीकडून गोमंतकीयांना मोठ्या अपेक्षा असतील. उल्लेखनीय म्हणजे, आशियाई स्पर्धेत निवडलेले हे दोघेच गोमंतकीय खेळाडू आहेत. कात्या कुएलो आणि ड्वेन कुएलो या दोघांनीही गोव्याला गौरव प्राप्त करून दिला आहे. आता त्यांच्याकडून राज्याला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
चेन्नई येथे एप्रिल महिन्यात याटिंग असोसिएशन आॅफ इंडियातर्फे निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यात भारतातील आघाडीचे सेलर्स सहभागी झाले होते. या चाचणीतून गोव्याच्या कुएलो बंधू-भगिनीची निवड झाली. तीन वर्षांपासून ड्वेन याने आशियाई स्पर्धेसाठी तयारी सुरू केली होती. त्याने सिंगापूर ओपन विंडिसर्फिंग स्पर्धेत ‘आरएस : वन क्लास’ या पुरुष व युथ या दोन्ही गटात अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकाविले होेते.
१८ वर्षीय कात्या ही आर्डी स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने चीन येथे झालेल्या ‘युथ आॅलिम्पिक २०१४’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.अशी कामगिरी करणारी ती पहिली मुलगी होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. विंडसर्फिंगमध्ये एक आघाडीची महिला खेळाडू बनली आहे. आशियाई स्पर्धेबाबत ती आशावादी आहे. तिने पोलंड आणि इटली येथील स्पर्धेतही शानदार प्रदर्शन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, कात्या आणि ड्वेन या दोघांनाही त्यांचे वडील डोनाल्ड कुएलो यांनी प्रशिक्षण दिले आहे. ते त्यांच्यासोबत जकार्ता येथेही आहेत.
गोवा यॉटिंग असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सातर्डेकर यांनी सांगितले की, " विंडसर्फिंगमध्ये भारत प्रथमच सहभाग होत आहे. त्यामुळे ड्वेन आणि कात्या हे या खेळात आशियाई स्पर्धेत सहभागी होणारे पहिलेच आहेत. मंगळवारपासून (दि.२१) आरएस वन या रेसिंगमध्ये मिश्र गटात सांघिक गटात हे दोघेही उतरतील. यामध्ये एकूण १२ शर्यती असतील. प्रत्येक शर्यत महत्वाची असेल. आशियाई विंडसर्फिंग स्पर्धेनंतर या दोघांचाही आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी कामगिरीतही सुधारणा केली आहे. त्यामुळे आशा असेल. विंडसर्फिंग हे समुद्रातील वाºयांवर अधिक अवलंबून असते. त्यामुळे स्थिती कशी असेल हे आताच सांगता येणार नाही. "