Asian Games 2018 : गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक, तेजींदरपालचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 07:32 PM2018-08-25T19:32:29+5:302018-08-25T19:52:29+5:30
Asian Games 2018: भारताच्या तेजींदरपाल सिंग तूरने आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक पटकावून दिले.
जकार्ता - भारताच्या तेजींदरपाल सिंग तूरने आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक पटकावून दिले. त्याने पाचव्या प्रयत्नांत 20.75 मीटर गोळाफेक करून भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने या कामगिरीसह आशियाई विक्रमही नावावर केला. आशियाई स्पर्धेत 1951 ते आत्तापर्यंत भारताला सर्वाधिक 9 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्यपदक गोळाफेकीत मिळालेली आहेत. ती परंपरा तेजींदरपालने कायम राखली.
GOOOOOOOOLD for #India by @Tajinder_Singh3 with NEW GAMES RECORD of 20.75m in Men's Shot Put at #AsianGames2018#TeamIndia-Athletics open account at the Games with a #Gold medal. This is also a NEW #Indian RECORD@ioaindia@IndiaSports@Ra_THORe@Media_SAI@Adille1
— Athletics Federation of India (@afiindia) August 25, 2018
तेजींदरने पहिल्याच प्रयत्नात 19.96 मीटर गोळाफेक करताना अव्वल स्थान कायम राखले होते. पंजाबच्या या 23 वर्षीय खेळाडूने जकार्तात आपल्या कामगिरीत सुधारणा केली. सौदी अरेबीयासाठी तीन सुवर्णपदक जिंकणाऱ्या सुलतान अब्दुलमाजीद अल्हेबशीला पहिल्या तिन्ही प्रयत्नांत अपयश आल्याने तो पदक शर्यतीतून बाद झाला. त्यामुळे तेजींदरपाल सिंगच्या पदकाच्या आशा उंचावल्या.
पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील खोसा पांडो गावात जन्मलेल्या या खेळाडूचे पहिले प्रेम क्रिकेट होते. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या तेजींदरपालने वडिलांखातर गोळाफेक खेळाची निवड केली. 2017च्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 20.40 मीटर गोळाफेकला होता. मात्र, त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रतेसाठीचे 20.50 मीटर अंतर गाठता आले नाही. त्यानंतर 2017च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तूरने 19.77 मीटरसह रौप्यपदक जिंकले होते. अवघ्या 0.03 मीटरने त्याचे सुवर्णपदक हुकले होते.