Asian Games 2018: राहीसाठी ही विक्रमी कामगिरी महत्त्वाची - पवन सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 05:54 AM2018-08-23T05:54:33+5:302018-08-23T05:54:51+5:30
महाराष्ट्राची अव्वल नेमबाज राही सरनोबतसाठी आशियाई स्पर्धेतील विक्रमी सुवर्ण अत्यंत महत्त्वाचे आहे.
पुणे : महाराष्ट्राची अव्वल नेमबाज राही सरनोबतसाठी आशियाई स्पर्धेतील विक्रमी सुवर्ण अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे राहीचा आत्मविश्वास वाढणार असून, तो तिला आगामी काळात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद आणि जागतिक स्पर्धेसाठी उपयोगात येणार असल्याचे मत ‘रायफल असोसिएशन आॅफ इंडिया’चे सह सरचिटणीस जनरल पवन सिंग यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
पवन म्हणाले की, ‘राहीने ज्या २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण जिंकले आहे, अशी कामगिरी आतापर्यंत कोणत्याही महिला नेमबाजपटूने आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली नाही. आज राहीने जी कामगिरी केली तिला तोड नाही. गेले दोन वर्षे राही दुखापतीवर उपचार घेत होती. जर्मनीच्या मुंबीयार या महिला मार्गदर्शकांकडे ती सराव करीत असून, त्यांनी तिच्या दुखापतीवर योग्य प्रकारे उपचार घेण्यासाठी तिला खूप साहाय्य केले आहे.
राहीचा आत्मविश्वास आणि तिची एकाग्रता यासाठी त्यांनी तिच्याकडून योग्य ते व्यायाम प्रकार आणि योगसाधना करून घेतली आहे.’ राहीच्या पुढील स्पर्धांविषयी पवन म्हणाले, ‘आगामी काळात कोरिया येथे होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि नवी दिल्ली येथे फेब्रुवारी २०१९मध्ये प्रथमच होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी हे सुवर्णपदक राहीसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण त्या आॅलिम्पिक कोटा स्पर्धा असतील. राहीने आज ५८० गुणांची कामगिरी केली आहे आणि आयएसएसएफच्या आतापर्यंतच्या पात्रता आलेखानुसार राहीच्या शूटिंग प्रकारासाठी अंदाजे ५८४ ते ८५५ गुणांची पात्रता असते. राही या वाढलेल्या आत्मविश्वासाने ही पात्रता नक्कीच गाठू शकणार आहे. तिच्या प्रकारात प्रिसिजन शूटिंग आणि रॅपिड फायर (ड्युलिंग) असे मिळून गुण ग्राह्य धरले जातात.