Asian Games 2018 : ऋतुजा भोसले व प्रार्थना ठोंबरेला उत्कृष्ट कामगिरीचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 04:44 AM2018-08-14T04:44:23+5:302018-08-14T04:44:47+5:30
‘आव्हान मोठे आहे; पण संघातील इतर दिग्गज खेळाडू सोबत असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन खूप मिळत असते. त्यांच्याकडून प्रत्येकवेळी टिप्स मिळत असतात. या स्पर्धेसाठी माझा सराव जोरात सुरू आहे. कोणतीही कसर मी बाकी ठेवणार नाही. दुहेरीत मी प्रांजला यादलापल्ली सोबत खेळणार असल्यामुळे आम्हा दोघींना एकमेकींचा खेळ चांगला माहीत आहे.
‘आव्हान मोठे आहे; पण संघातील इतर दिग्गज खेळाडू सोबत असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन खूप मिळत असते. त्यांच्याकडून प्रत्येकवेळी टिप्स मिळत असतात. या स्पर्धेसाठी माझा सराव जोरात सुरू आहे. कोणतीही कसर मी बाकी ठेवणार नाही. दुहेरीत मी प्रांजला यादलापल्ली सोबत खेळणार असल्यामुळे आम्हा दोघींना एकमेकींचा खेळ चांगला माहीत आहे. दोघींचा कोर्टवरील समन्वय चांगल्या प्रकारे जुळलेला आहे,’ असे पुण्याच्या ऋतुजा भोसलेने सांगितले. ती पुढे म्हणाली, ‘प्रांजलासोबत गेल्या वर्षापासून खेळत असून नुकतीच आम्ही थायलंडमध्ये आयटीएफ स्पर्धा जिंकली. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील प्रतिस्पर्ध्यांचा खेळ पाहायला मिळाला आहे. कोणता प्रतिस्पर्धी कसा खेळता, याचा अभ्यास दोघीही करीत आहोत. कोर्टवर खेळताना कोणताही दबाव न घेता खेळ करण्याचा आमचा प्रयत्न असतो. खेळताना छोट्या चुका झाल्या किंवा एखादा गुण हातातून गेला तेव्हा आम्ही विनोदी राहून दबाव न घेण्याचा प्रयत्न करतो. जपान, चीन, थायलंड संघ सुद्धा या स्पर्धेत सहभागी होत आहे. मी ४ वर्षे अमेरिकन कॉलेज टेनिस खेळली आहे, तरीसुद्धा आशियाई खेळाडूचा मला चांगलाच अभ्यास आहे. चीनचे खेळाडू जोरदार फटके मारण्यात विश्वास ठेवतात, तर जपानचे खेळाडू मोठ्या रॅलीवर भर देतात. आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रथमच प्रतिनिधित्व करीत आहे. हे माझे स्वप्न पूर्ण झाले. अजून एक स्वप्न आहे.. आॅलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे. जकार्ता स्पर्धेतील माझ्या निवडीमुळे आनंद तर झाला आहेच; पण आपल्या संघाला पदक जिंकून दिले, तर तो आनंद द्विगुणीत होईल.’
प्रार्थना ठोंबरे
गत आशियाई स्पर्धेत सानिया मिर्झा सोबत खेळून पदक जिंकल्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे, या वेळी तिला मी मिस करीन. फ्रान्समधील स्पर्धेत मी उपविजेतेपद जिंकले होते. विशेष म्हणजे, ज्या आशियाई खेळाडूंना मी हरविले तेदेखील या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे खेळताना दडपण नसणार आहे. माझ्या पार्टनर्सची अजून पुष्टी झाली नाही, तरीही मी पदक जिंकण्यासाठी सर्वस्व अपर्ण करीन. या वेळी मिश्र दुहेरीमध्ये खेळणार आहे, रोहन बोपण्णा सोबत खेळण्याची शक्यता जास्त आहे. वर्षभर आम्ही वैयक्तिक म्हणून खेळतो; पण आशियाई स्पर्धेमध्ये खेळण्याचा वेगळा अनुभव असतो. इथे टीम म्हणून आम्ही खेळतो, टीम मधल्या खेळाडूचा आधारदेखील खूप असतो आणि योग्य वेळी ते प्रेरणा देतात. रोजची तयारी आणि सामन्या अगोदरची तयारी कशी केली पाहिजे, सामना संपल्यानंतर कशी रिकव्हरी केली पाहिजे, सामन्यामध्ये महत्त्वाच्या क्षणी काय अपेक्षित केले पाहिजे? याकडे लक्ष दिले जात आहे. गत आशियाई स्पर्धेत आम्ही उपांत्य फेरीत चीन (तैपेई)च्या खेळाडूंकडून हरलो. त्यांच्यासह जपान, चीन, थायलंड यांच्या कडूनसुद्धा आव्हान अपेक्षित करीत आहे.
१९५८ मध्ये आशियाई क्रीडामध्ये टेनिसचा समावेश झाल्यापासून भारताने टेनिसमध्ये आतापर्यंत २९ पदके जिंकली आहे, त्यात ८ सुवर्ण, ६ रौप्य, १५ कांस्य पदकांचा समावेश आहे. नवीन नियमाप्रमाणे आशियाई क्रीडामध्ये सुवर्णपदक मिळून थेट टोकियो आॅलिम्पिकसाठी प्रवेश मिळेल. यामुळे ही स्पर्धा महत्त्वाची झाली आहे. नेहमीप्रमाणेच तैपेई (चीन), चीन, जपान, उझबेकिस्तान यांचे आव्हान तर आहेच; पण भारतीय टेनिस संघ सगळ्यांना तोंड देण्यास सक्षम आहे. रामकुमार रामनाथनवर एकेरीत पदक मिळवण्याची मदार असणार आहे. रामनाथनकडून पदकाची अपेक्षा नक्कीच आहे. रामनाथन सोबत प्रजनेष गुंनेस्वरनसुद्धा एकेरीत सहभाग करणार आहे.
४५ वर्षीय लिएंडर पेस दुहेरीत खेळणार आहे, त्याने आतापर्यंत आशियाई क्रीडा मध्ये ५ सुवर्णपदकांसह एकून सात पदके जिंकली आहे. भारताचा प्रशिक्षक जिशान अलीने रामनाथनसोबत लिएंडरचे खेळण्याचे संकेत दिले आहे. लिएंडर मिश्र दुहेरीत अंकिता रैनासोबत खेळणार आहे. अंकितासुद्धा उत्तम फॉर्ममध्ये आहे, दोघेही मिश्र दुहेरी पदक जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहे. रोहन बोपण्णा यंदा दिवीज शरण सोबत खेळणार आहे. दिवीजनेची दुहेरीत रँकिंग सध्या ३६ आहे. डावखुरा दिवीज आणि उजव्या हाताचा बोपण्णाची जोडी प्रतिभाशाली असणार आहे आणि सुवर्णपदक जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहे.
स्पर्धेतील सुवर्ण पदके - 5
पुरुष व महिला एकेरी
पुरूष आणि महिला दुहेरी
मिश्र
दुहेरी
भारतीय संघ
भारतीय टेनिस संघ (पुरुष):- लिएंडर पेस, रोहन बोपण्णा, रामकुमार रामनाथन, प्रजनेष गुंनेस्वरन, दिवीज शरण, सुमीत नागल
भारतीय टेनिस संघ (महिला):- अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे, ऋतुजा भोसले, करमान कौर, प्रांजला यादलापल्ली, रिया भाटिया
आशियाई स्पर्धेतील भारताची कामगिरी
२९: भारताने जिंकलेली एकून पदके
८: भारताने जिंकलेली सुवर्णपदके
५: भारताने २०१४ मध्ये जिंकलेली पदके
७: लिएंडर पेसने जिंकलेली पदके
महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे आणि ऋतुजा भोसले यांचादेखील आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग असणार आहे.
- शब्दांकन : अभिजित देशमुख