Asian Games 2018: जकार्तातील लोकांच्या आयुष्यातील आठ वर्षे वाहतुक कोंडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 01:58 PM2018-08-18T13:58:37+5:302018-08-18T16:52:35+5:30
Asian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद जेव्हा जकार्ताला बहाल करण्यात आले तेव्हा वाहतुक आणि त्यावरील तोडगा, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला.
- अभिजीत देशमुख
(थेट जकार्ता येथून)
आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद जेव्हा जकार्ताला बहाल करण्यात आले तेव्हा वाहतुक आणि त्यावरील तोडगा, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला. जकार्ताची लोकसंख्या १ कोटी पेक्षा जास्त आहे आणि साधारणपणे इथल्या लोकांची आयुष्याची ८ वर्ष वाहतुकीतच खर्च होतात. एखाद्या देशाच्या राजधानी मध्ये एवढ्या प्रमाणाने वाहतुकीची समस्या असेल, विश्वासच बसत नाही.
ग्रेटर जकार्ताच्या भागातून दररोज तीन लाख ५० हजार पेक्षा जास्त लोक या उष्ण व दमट शहरात आपल्या AC कारमधून प्रवास करतात. काही लोक केवळ श्रीमंती दाखवायचा हेतूने कार मध्ये प्रवास करतात. त्यांची कार, बरेच तास एकाच जागेवर असतात आणि ग्रिडलॉकवेळी काही लोक गाडीच्या बाहेर उतरून पटकन शॉपिंग करून सुद्धा येतात. बरीचशी लोकं सरकारी वाहतूकीचा उपयोग करतात पण कार, दुचाकीवर भर जास्त आहे. मेट्रो इथे खूप कमी प्रमाणात आहे आणि स्पर्धा अगोदर मेट्रो प्रकल्प पूर्ण होणार नाही म्हणून इथल्या सरकारने काही महिन्यांपूर्वी काम थांबवले आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी
राजधानी असल्यामुळे मोठी जड वहाने सुद्धा नेहमीच रोड वर दिसून येतात. दक्षिण व पश्चिम जकार्तामधून सेंट्रल जकार्तात येताना सर्वात जास्त वेळ लागतो. एका तासत तुमचा केवळ ४-५ किमी प्रवास होणे शक्य आहे. सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेस सर्वात जास्त वाहतुक संपूर्ण जकार्तामध्ये असते. वाहतुक कोंडी हा जकार्तातील लोकांनी जीवनातील एक भाग म्हणून स्वीकारला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धवेळी काही उपाय काढण्यात आले आहे, परंतु स्पर्धेनंतर परत कोंडी दिसेल,अशी भावना इथल्या लोकांच्या मनात आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी उपायः
खास आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जकार्तामध्ये दाखल झालेल्या १६,००० खेळाडू, ६ हजार सामना अधिकारी आणि जवळपास ४ हजार पत्रकार यांची वाहतुक कोंडीमुळे फजिती होऊ नये, म्हणून काही उपाय करण्यात आले आहेत. केमायोरण येथे खेळाडूंचे क्रीडाग्राम बांधण्यात आले आहे. मुख्य स्टेडियम सेंट्रल जकार्ता मध्ये असून क्रीडाग्रामचा प्रवास १ तासापेक्षा जास्तीचा आहे. प्रत्येक खेळाडूच्या बस पुढे काही दुचाकी व चारचाकी पोलीस असणार आहे. त्याचे काम सुरक्षा व्यतिरिक्त समोरची वाहतुक कोंडी अलार्मद्वारे सोडवण्याचे असणार आहे.
भारतामध्ये मंत्री लोकांना जसे प्राधान्य दिले जाते तसेच प्रत्येक खेळाडूच्या बसला देण्यात येत आहे. यामुळे खेळाडूंचा निम्मा वेळ वाचणार आहे, हा प्रयोग अतापर्यंत यशस्वी दिसत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धावेळी वाहन चालकांना ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू असणार आहे. काही मुख्य टोल रोड दररोज काही तास बंद ठेवण्यात येणार आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांची मात्र चांदी झाली आहे. सर्व शाळांना आशियाई क्रीडा स्पर्धेवेळी १५ दिवस सुट्टी देण्यात आली आहे.
दुचाकी वाहक सर्वात वेगवान सुविधाः
जगातील सर्वात वाईट वाहतुक कोंडीत कुठे ही लवकर पोहचायचे असेल तर गो जेक किंवा गो ग्रॅब दुचाकी वाहक तुमच्या सेवेत हजर असतात.अगदी उबेर-ओला पद्धितीच्या अँपद्वारे बुकिंग करा,काही वेळातच एक हिरवा जॅकेट आणि हिरवा हेल्मेट दुचाकी वाहक तुम्हाला भेटेल. तुम्हाला हेल्मेट सुद्धा घालू लागेल कारण वाहक अगदी हॉलिवूड चित्रपटात शोभेल अशा गतीने गाडी चालवतात. ट्रॅफिकचे सगळे नियम पाळतात, उगच आपल्या सारख्या फूटपाथ वरून किंवा सिग्नल तोडून असह्य गाडी चालवत नाही. जाकार्तामध्ये जर तुम्ही एकटे असाल तर गो जेक किंवा गो ग्रॅब दुचाकी वाहक सुविधा तुम्हाला लवकर सुरक्षित कुठेही पोहचवतील.