Asian Games 2023 : जिद्दीला सलाम! कोरोना काळात 'वेटर'चं काम करून आशियाई स्पर्धा गाजवणारा 'राम बाबू'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 01:50 PM2023-10-04T13:50:19+5:302023-10-04T13:50:41+5:30
सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगला असून भारतीय शिलेदारांची चमकदार कामगिरी सुरूच आहे.
सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगला असून भारतीय शिलेदारांची चमकदार कामगिरी सुरूच आहे. स्पर्धेच्या अकराव्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी कमाल केली. मंजू राणी आणि राम बाबू यांनी कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकांची संख्या वाढवली. मंजू राणी आणि राम बाबू यांनी देशासाठी ७० वे पदक जिंकले. कांस्य पदक विजेत्या राम बाबू हिची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा आहे. कधीकाळी वेटरचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या राम बाबूने आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले.
दरम्यान, मंजू राणी आणि राम बाबू या जोडीने बुधवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत ३५ किमी चालण्याच्या शर्यतीत देशाला कांस्य पदक जिंकून दिले. राम बाबूने २ तास ४२ मिनिटे ११ सेकंदात शर्यत पूर्ण केली तर मंजू राणीने ३ तास ९ मिनिटे ३ सेकंदात अंतर गाठले. भारताने ५ तास ५१ मिनिटे १४ सेकंद अशी एकत्रित वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. सुवर्ण पदक विजेत्या चिनी संघापेक्षा भारतीय शिलेदार ३४ मिनिटे ३३ सेकंदांनी मागे राहिले.
कोरोना काळात 'वेटर' पण...
राम बाबू कोरोना काळात मनरेगा अंतर्गत मजूर म्हणून काम करायचा. माती खोदण्याचे काम करून तो पैसे कमवायचा. याआधी त्याने वाराणसीमध्ये वेटर म्हणूनही काम केले होते. वेटरच्या कामात रस वाटत नसल्याने त्याने माती खोदून आपली वाटचाल सुरू केली. मागील वर्षी राष्ट्रीय विक्रम केल्यानंतर राम बाबू म्हणाला होता, "लोक वेटर्ससोबत चांगले वागत नाहीत. ते त्यांना कमी लेखतात. लोक ज्या प्रकारे मला 'छोटू' आणि इतर नावांनी हाक मारायचे ते दिवस आठवून मला खूप वाईट वाटते. तेव्हा मी असाच विचार करायचो की, मला लवकरात लवकर यातून बाहेर पडायचे आहे."
This! https://t.co/blI4sYunp4
— India_AllSports (@India_AllSports) October 4, 2023
चित्रपट पाहून सुरूवात केली अन्...
क्रीडा क्षेत्राशी निगडीत चित्रपट पाहून प्रेरित होऊन बाबूने धावायला सुरुवात केली. आधी तो मॅरेथॉन करत असे पण २०१८ मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे राम बाबूच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. पण, त्याने हार न मानता चालण्याच्या शर्यतीचा सराव सुरू केला. राम बाबूने २०२२ च्या राष्ट्रीय खेळांमध्ये राष्ट्रीय विक्रम केला होता.