Asian Games 2023 : १९७४ ते २०२३! तेजस्वीन शंकरने डेकॅथलॉनमध्ये भारताची ४९ वर्षांची प्रतीक्षा संपवली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 08:49 PM2023-10-03T20:49:32+5:302023-10-03T20:50:23+5:30
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar ) पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत ७६६६ गुणांसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रौप्यपदक जिंकले.
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar ) पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत ७६६६ गुणांसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रौप्यपदक जिंकले. याआधी त्याने १५०० मीटरच्या अंतिम फेरीत चौथे स्थान पटकावले होते. १९७४ नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक आहे. १९७४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत विजयसिंह चौहान याने पदक जिंकले होते. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम भारतिंदर सिंगच्या नावावर ७६५८ गुणांचा होता.
तेजस्वीनने १५०० मीटर शर्यत ४ मिनिटे ४७.५५ सेकंदात पूर्ण केली आणि त्याच्या खात्यात ६३४ गुण जमा करून रौप्यपदक निश्चित केले. त्याने जपानच्या यामू मारूयामाला मागे टाकले. चिनच्या सून क्यूहाओने ७८१६ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तेजस्वीनने तीन क्रीडा प्रकारात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. त्याने ३९.२८ मीटर लांब थाळी फेकली, १३.३९ मीटर लांब गोळा फेकला आणि ४.१० मीटर बांबू उडी मारली.
"माझ्या कामगिरीवर मी खूप खूश आहे. राष्ट्रीय विक्रम मोडणे हे ध्येय होते, जे मी करू शकलो. मला थोडी अधिक अपेक्षा होती पण मला त्रास होत होता, त्यामुळे ठीक आहे," असे तेजस्वीनने ऐतिहासिक पदकानंतर सांगितले. डेकॅथलॉनच्या दहा स्पर्धांमध्ये पहिल्या दिवशी तेजस्वीनने १०० मीटरमध्ये ११.१२ सेकंद वेळेसह ८३४ गुण, लांब उडीमध्ये ७.३७ मीटर अंतरासह ९०३ गुण, १३.३९ मीटर थ्रोसह ५९१ गुण, १००२ गुणांची कमाई केली. उंच उडीत आणि ४०० मीटरमध्ये ४९.६७ सेकंदांसह ८३० गुण अशा एकूण ४२६० गुणांच्या आघाडीसह दिवसाचा शेवट केला होता.
Tejaswin Shankar breaks a 39-year curse & brings home 🥈 in the Men's #Decathlon 🔥💪
— Sony LIV (@SonyLIV) October 3, 2023
The former high-jumper becomes the first #TeamIndia athlete to win a medal in this event since 1974 🤯🙌 #Cheer4India#Athletes#HangzhouAsianGames#AsianGames2023#SonyLIVpic.twitter.com/1iQ3qvu6Hk
दुसऱ्या दिवशी, तेजस्वीनने ११० मीटर अडथळा शर्यतीत १४.७८ सेकंदाच्या वेळेसह ८७६ गुण, थाळी फेकीत ३९.९८ मीटरच्या नवीन वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह ६५० गुण, बांबू उडीत ४.१० मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह ६४५ गुण, भालाफेकीत ५१.७७ मीटर लांब भालाफेकीसह ६०६ गुणांची कमाई केली. १५०० मीटरमध्ये ४:४७.५५ या वेळेसह ६२९ गुण जमा केले. त्याने ११ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रमही मोडला.
डेकॅथलॉन मध्ये भारताला पदक जिंकून देणारे खेळाडू
१९५१ - खुर्शीद अहमद ( कांस्य)
१९५४ - रॉनी ओ'ब्रायन ( कांस्य)
१९६२ - गुरबचन सिंग रंधावा ( सुवर्ण)
१९७० - एम जी शेट्टी ( रौप्य)
१९७४- विजय सिंग चौहान ( सुवर्ण)
१९७४- सुरेश बाबू ( कांस्य)