आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी; पहिल्यांदाच 70+ पदकांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:24 PM2023-10-04T15:24:43+5:302023-10-04T15:25:40+5:30
Asian Games 2023 Medal Tally: आशियाई क्रीडा स्पर्धेला अजून 4 दिवस बाकी आहे, त्यामुळे पदकांची संख्या वाढणार आहे.
India at Asian Games: चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games 2023) सुरू आहे. गेल्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंनी 70 हून अधिक पदके जिंकली आहेत. चीनच्या हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा 2023 च्या 11व्या दिवशी भारताने 70+ पदके जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी 2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 70 पदके जिंकली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेला 4 दिवस बाकी असल्याने यावेळी पदकांची संख्या आणखी वाढण्याची खात्री आहे.
1951 पासून आशियाई खेळ नियमितपणे खेळले जातात. पहिल्या स्पर्धेचे आयोजन भारतात झाले होते. 72 वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 15 सुवर्णपदकांसह 51 पदके जिंकली होती. मात्र, त्यानंतर 31 वर्षे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 50 पदकांचा आकडा गाठता आला नाही. 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले, तेव्हा भारताने 57 पदके जिंकली.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 72 वर्षांच्या इतिहासात बहुतांश वेळा भारताने 15 ते 25 पदकांची कमाई केली. मात्र, गेल्या चार आशियाई खेळांमध्ये भारत सातत्याने 50+ पदके जिंकत आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (2018) भारताने प्रथमच 70 पदके जिंकली होती. मात्र, यावेळी भारत मागील आकड्यांपेक्षा पुढे गेला आहे.
सुवर्णपदकाचा विचार केला, तर यंदाची आशियाई स्पर्धा भारतासाठी सर्वोत्तम ठरू शकते. भारताने आतापर्यंत 16 सुवर्णपदके जिंकली आहेत. भारताचा मागील सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड 16 सुवर्ण पदकांचा होता, जो 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेतील आहे. पण, यंदाच्या हंगामात भारताकडे सुवर्ण आणि एकूण पदकांची संख्या वाढणार आहे.