Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या पोराची शान! अविनाश साबळेने जिंकले दुसरे पदक, १९८२ नंतर घडला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 05:30 PM2023-10-04T17:30:59+5:302023-10-04T17:31:16+5:30
Asian Games 2023: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे ( Avinash Sable) याने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये इतिहास रचला. ३
Asian Games 2023: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे ( Avinash Sable) याने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये इतिहास रचला. ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर अविनाशने आज ५००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. अविनाशने शेवटच्या लॅपपर्यंत तिसरे स्थान टिकवले होते, परंतु शेवटच्या लॅप्सची बेल वाजली अन् त्याने दुसऱ्या क्रमांकावर कूच केली. पण बाहरिनच्या फिकादू दावीतने मिळवलेली आघाडी तो कमी करू शकला नाही. त्याला रोप्यपदकावर समाधान मानावे लागले. १९८२नंतर या क्रीडा प्रकारातील भारताचे हे पहिले पदक ठरले.
भारतीय लष्करात असलेल्या अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस ( अडथळ्यांची) शर्यतीत ८ मिनिटे १९.५०सेकंदाची वेळ नोंदवत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. तो आशियातील सर्वात वेगवान ३००० मीटर स्टीपलचेसपटू ठरला. अविनाशने २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या होसेन केहानीचा ८ मिनिटे २२.७९ सेकंदाचा चा आशियाई विक्रम मोडला. ३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत अविनाशने सुरुवातीपासूनच गती सेट केली आणि पहिल्या ५० मीटरमध्ये उर्वरित खेळाडूंना मागे टाकले. त्याने शेवटपर्यंत हा वेग कायम ठेवला.
अविनाश १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंडियाना आर्मीमध्ये दाखल झाला. लष्करासाठी अविनाशने सियाचीनच्या बर्फाळ हिमनदीपासून ते राजस्थानच्या वालुकामय भागापर्यंत देशाची सेवा केली. आर्मीमध्ये असताना २०१५ मध्ये त्याने अॅथलीट होण्याचा निर्णय घेतला. १३ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्रातील मांडवा गावात जन्मलेला हा तरुण आता देशाची शान बनला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अविनाशला लहानपणी शाळेत जाण्यासाठी ६ किलोमीटर चालत जावे लागे, त्यामुळे तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याच्यात रेसिंगची आवड कायम राहिली. २०१७ मध्ये, आर्मीचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला स्टीपल चेसमध्ये धावण्यास सांगितले आणि त्यानंतर अविनाशने मागे वळून पाहिले नाही.