आशियन क्रीडा स्पर्धा : गोल्डन गर्ल्सकडून असणार ‘सुवर्ण’ अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:30 AM2018-08-04T03:30:54+5:302018-08-04T03:31:11+5:30

इंडोनेशियातील जकार्ता येथे १८ आॅगस्टपासून आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. यासाठी भारताचा ५२४ सदस्यीय संघ पदकासाठी प्रयत्न करेल. ५२४ खेळाडूंच्या ताफ्यात २७७ पुरुष व २४७ महिला खेळाडू आहेत.

 Asian Games Competition: 'Golden Gold' to be expected from Golden Girls | आशियन क्रीडा स्पर्धा : गोल्डन गर्ल्सकडून असणार ‘सुवर्ण’ अपेक्षा

आशियन क्रीडा स्पर्धा : गोल्डन गर्ल्सकडून असणार ‘सुवर्ण’ अपेक्षा

googlenewsNext

- सचिन कोरडे

पणजी : इंडोनेशियातील जकार्ता येथे १८ आॅगस्टपासून आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. यासाठी भारताचा ५२४ सदस्यीय संघ पदकासाठी प्रयत्न करेल. ५२४ खेळाडूंच्या ताफ्यात २७७ पुरुष व २४७ महिला खेळाडू आहेत. स्पर्धेत एकूण ३६ खेळांचा समावेश आहे. सध्या महिला खेळाडू वेगाने झळकताना दिसताहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २६ पदकापैकी २० पदके ही महिलांनी पटकाविली आहेत. त्यामुळे आगामी आशियाई स्पर्धेतही महिलांकडून चांगली अपेक्षा असेल. वेटलिफ्टर मीराबाई चानू, ४०० मीटरची धावपटू हिमा दास यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
त्यातल्या त्यात ‘या’ सहा ‘गोल्डन गर्ल’ वर संपूर्ण भारतीयांचे लक्ष असेल. कोण आहेत ‘त्या’...जाणून घेऊ.या..

विनेश फोगट
‘दंगल गर्ल’ बबीता आणि गीता या दोघींपेक्षा ही कमी प्रसिद्धीची. मात्र, २०१४ मध्ये इन्चोन येथे झालेल्या स्पर्धेत तिने ४८ किलो फ्रिस्टाईलमध्ये कांस्यपदक मिळवून दिले होते. खराब लय आणि गंभीर दुखापतीनंतर तिने जबरदस्त पुनरागमन केले. तिने राष्ट्रकुल स्पर्धेत ५० किलो फ्रिस्टाईल कुस्तीत सुवर्ण मिळवले. साक्षी मलिक मात्र अपयशी ठरली होती. त्यामुळे विनेश फोगट ही आता अपेक्षांच्या प्रकाशझोतात आहे.

मिराबाई चानू
मणिपूरची ही जबरदस्त वेटलिफ्टर. तिने नुकताच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४० किलो गटात विक्रम मोडत १९६ किलो वजन उचलले. विश्व भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती एकमेव भारतीय आहे. १९९५ पासून तिच्या नावावर हा विक्रम कायम आहे. ४८ किलो गटात १९४ किलो वजन उचलण्याचा नवा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे. याच जोरावर ती पदकाची दावेदार म्हणून गणली जात आहेत.

मेरी कोम
तीन मुलांची आई आणि राज्यसभेची खासदार असलेली मेरी कोम सध्यातरी रिंगणातून माघार घ्यायला तयार नाही. पदकासाठी तिने ग्लोज घट्ट बांधले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहे. चार वर्षांपूर्वी तिने ५१ किलो गटात सुवर्ण मिळवले होते. मात्र, यावर्षी ती ४५-४८ या गटात खेळणार आहे. पहिली भारतीय महिला आहे जिने सहा पैकी पाच सुवर्ण जिंकलेले आहेत.

हिमा दास
गेल्या काही दिवसांत सर्वदूर हिमा दासचे नाव झळकले. आसामच्या एका शेतकऱ्याच्या १८ वर्षीय मुलीने अ‍ॅथलेटिक ज्युनियर विश्व चॅम्पियनशीपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. आंतर जिल्हा स्पर्धेनंतर केवळ १८ महिन्यांत तिने मिळवलेले हे आंतरराष्ट्रीय यश वाखाणण्याजोगे आहे. ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. तिचा ५१:४६ असा वेळ होता. निश्चितच, हिमा दास ही सुद्धा सुवर्णची दावेदार असेल.

मणू भाकेर
हरियणाची ही १६ वर्षीय नेमबाज. या वर्षी आंतरराष्ट्रीय शूटींग स्पोटर््स फेडरेशन (आयएसएसएफ) स्पर्धेत तिने दोन सुवर्ण पटकाविले. स्पर्धेत अव्वल स्थान मिळवणारी ती पहिली सर्वात लहान खेळाडू ठरली. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने नव्या विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. तिची २४०.९ गुणांची विक्रमी अशी कामगिरी होती. हरयाणाची ही युवा नेमबाज भारताला आशियाई स्पर्धेत सुवर्ण मिळवून देऊ शकते, अशा विश्वास व्यक्त होत आहे.

सायना नेहवाल
बॅडमिंटनमधील सर्वात मोठे नाव. सायना आणि पी.व्ही. सिंधू यांच्यात चुरस पाहायला मिळेल. हरियणाच्या या खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूचा पराभव केला. सायना सध्या जगात १२ व्या क्रमांकावर असली तर तिचा अनुभव आणि कौशल्य पाहता तिच्याकडून अपेक्षा असेल. सायनाने सिंधूचा २१-१८ आणि २३-२१ ने पराभव करीत सुवर्ण मिळवले होते. सायना हिच्याकडून या स्पर्धेत खूप अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

Web Title:  Asian Games Competition: 'Golden Gold' to be expected from Golden Girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा