Asian Games: ट्रॅपमध्ये सुवर्णवेध! नेमबाजांची सोनेरी कामगिरी, भारताच्या खात्यात ११वं गोल्ड मेडल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 10:38 AM2023-10-01T10:38:49+5:302023-10-01T10:39:09+5:30
Asian Games: भारताच्या नेमबाजांनी चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. आज झालेल्या नेमबाजीच्या मेन्स टीम इव्हेंट ट्रॅप शूटिंगमध्ये भारताच्या के. चेनाई, पृथ्वीराज आणि जोरावर सिंह यांनी सुवर्णपदकावर निशाणा साधला आहे.
भारताच्या नेमबाजांनी चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. आज झालेल्या नेमबाजीच्या मेन्स टीम इव्हेंट ट्रॅप शूटिंगमध्ये भारताच्या के. चेनाई, पृथ्वीराज आणि जोरावर सिंह यांनी सुवर्णपदकावर निशाणा साधला आहे. भारताने या स्पर्धेत नेमबाजीमध्ये जिंकलेले हे सातवे आणि एकूण ११वे पदक ठरले आहे.
के. चेनाई, पृथ्वीराज टोंडिमन आणि जोरावर सिंह यांनी अंतिम फेरीत अचून निशाणा साधताना भारताच्या खात्यात आणखी एका सोनेरी पदकाची भर टाकली. त्याबरोबरच या स्पर्धेत भारताने जिंकलेल्या पदकांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. त्यात ११ सुवर्णपदकांचा समावेश आहे.
आजच्या दिवसात नेमबाजीमध्ये भारताच्या खात्यामध्ये आणखी एक पदक जमा झाले होते. भारताच्या राजेश्वरी कुमारी, मनीषा कीर आणि प्रीति रजक यांच्या त्रिकुटाने वुमेन्स टीम ट्रॅप शूटिंगमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. तत्पूर्वी अदिती अशोक हिने इतिहास रचताना गोल्फमध्ये भारताला रौप्यपदक जिंकून दिले होते.