Asian Games: भारताने रोलर स्केटिंगमध्ये जिंकली दोन पदके, महिलांनंतर पुरुष संघानेही मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 10:13 AM2023-10-02T10:13:31+5:302023-10-02T10:13:45+5:30
Asian Games 2023: भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी रोलर स्केटिंगमध्ये दोन पदके जिंकून झोकात सुरुवात केली आहे. भारतीय संघाने ही दोन पदके महिलांच्या स्पीड स्केटिंग ३०० मीटर रिले रेस आणि पुरुषांच्या स्पीड स्केटिंग ३ हजार मीटर रिले रेसमध्ये जिंकली आहेत.
भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी रोलर स्केटिंगमध्ये दोन पदके जिंकून झोकात सुरुवात केली आहे. भारतीय संघाने ही दोन पदके महिलांच्या स्पीड स्केटिंग ३०० मीटर रिले रेस आणि पुरुषांच्या स्पीड स्केटिंग ३ हजार मीटर रिले रेसमध्ये जिंकली आहेत. त्याबरोबरच या स्पर्धेत भारताने जिंकलेल्या पदकांची संख्या ५५ झाली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी आज संजना, कार्तिका, हीरल आणि आरती यांच्या टीमने भारताला पहिले पदक मिळवून दिले. भारतीय महिला संघ स्पीड स्केटिंग ३ हजार मीटर रिले रेस ४ मिनिटे ३४.८६ सेकंद वेळ नोंदवत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्यांच्या पदरात कांस्यपदक पडले.
भारतीय महिला संघाच्या या कामगिरीनंतर काही वेळाने भारताच्या पुरुष संघाने स्पीड स्केटिंग ३ हजार मीटर रिले रेसमध्ये कांस्य पदक जिंकले. आर्यन पाल, आनंद कुमार, सिद्धांत आणि विक्रम यांनी ४ मिनिटे १०.१२९८ सेकंद वेळ नोंदवत हे पदक मिळवले.
आज सकाळी जिंकलेल्या या दोन पदकांसह या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जिंकलेल्या एकूण पदकांची संख्या ५५ झाली आहे. यामध्ये १३ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. त्याबरोबरच भारतीय क्रीडापटूंनी २१ रौप्य आणि २१ कांस्यपदके जिंकली आहेत. या स्पर्धेत यजमान चीन १३६ सुवर्णपदकांसह एकूण २४८ पदके जिंकून पहिल्या क्रमांकावर आहे.