आशियाई स्पर्धा; सुशील व साक्षी यांना निवड चाचणीत सहभागी न होण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 12:12 AM2018-05-26T00:12:04+5:302018-05-26T00:12:04+5:30
आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार व साक्षी मलिक यांच्यासह चार मल्लांना पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतून माघार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने शुक्रवारी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
नवी दिल्ली : आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार व साक्षी मलिक यांच्यासह चार मल्लांना पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतून माघार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने शुक्रवारी या वृत्तास दुजोरा दिला आहे. महासंघाने सुशील, साक्षी, विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांना चाचणीत सहभागी न होण्याची परवानगी दिली आहे. तशी त्यांनी विनंती केली होती.
याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी अधिकाºयाने सांगितले की, महासंघाच्या मते या खेळाडूंनी वारंवार स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांच्या वजनगटात कुठले आव्हान मिळणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
महासंघाच्या एका अधिकाºयाने सांगितले की,‘या मल्लांच्या तयारीमध्ये अडचण निर्माण होऊ नये, यासाठी डब्ल्यूएफआयने हा निर्णय घेतला. चाचणीत सहभागी न होण्याची त्यांची विनंती आम्ही मान्य केली. कारण ते आपापल्या वजन गटात सर्वोत्तम आहेत.’ अधिकारी पुढे म्हणाला,‘सुशीलने प्रशिक्षक विनोदच्या साथीने छत्रसाल स्टेडियममध्ये तयारी करण्याची विनंती केली होती. विनेश व साक्षी सध्या राष्ट्रीय शिबिरात आहेत तर बजरंग जॉर्जियामध्ये आपल्या खासगी प्रशिक्षकासोबत आहे.’ त्याचप्रमाणे, ‘आम्ही आपल्या प्रशिक्षकांसोबत चर्चा केल्यानंतर या खेळाडूंना चाचणीसाठी बोलविले तर त्यांच्या सरावामध्ये अडथळा निर्माण होईल आणि त्याचसोबत त्यांच्यावर अतिरिक्त दडपण येईल, अशी माहितीही अधिकाºयाने दिली. (वृत्तसंस्था)
सोनीपत, लखनौमध्ये चाचणी
फ्रीस्टाईल व ग्रीको रोमनमध्ये चाचणी १० जून रोजी सोनीपतमध्ये होईल. येथेच सराव शिबिर सुरू आहे. महिला मल्लांचे सराव शिबिर लखनौमध्ये सुरू असून तेथेच चाचणी १७ जून रोजी होण्याची शक्यता आहे.