आशियाई नेमबाजी : इलावेनिल-हृदय यांचा विश्वविक्रमी नेम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:32 AM2018-11-07T05:32:34+5:302018-11-07T05:32:51+5:30
इलावेनिल वलारिवान आणि हृदय हाजारिका या नेमबाजांनी मंगळवारी अभिमानास्पद कामगिरी करताना ११व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर रायफल स्पर्धेच्या मिश्र जोडी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली.
कुवेत सिटी : इलावेनिल वलारिवान आणि हृदय हाजारिका या नेमबाजांनी मंगळवारी अभिमानास्पद कामगिरी करताना ११व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर रायफल स्पर्धेच्या मिश्र जोडी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे या दोघांनी ज्युनिअर जागतिक विक्रमाची नोंद करताना स्पर्धेवर आपले एकहाती वर्चस्व राखले.
याच स्पर्धेत मेहुली घोष आणि अर्जुन बाबुता या अन्य भारतीय जोडीने कांस्य पदकाची कमाई करत भारतीयांना जल्लोष करण्याची दुहेरी संधी दिली. इलावेनिल - हृदय जोडीने ८३५.८ गुणांचा वेध घेत तिसऱ्या स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. यामध्ये मेहुली - अर्जुन यांनी ८३३.५ गुणांसह चौथे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
अंतिम फेरीत इलावेनिल - हृदय यांनी ५०२.१ गुणांचा विश्वविक्रमी वेध घेत अव्वल स्थानावर कब्जा करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. या दोघांच्या धडाक्यापुढे चीनच्या खेळाडूंना ५००.९ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मेहुली - अर्जुन यांनी ४३६.९ गुणांसह कांस्य पदक मिळवले. या स्पर्धेत आतापर्यंत भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण सहा पदकांची कमाई केली आहे. (वृत्तसंस्था)