भारत पुन्हा पडला पाकिस्तानला भारी, आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धेत दिली मात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 04:10 AM2019-08-11T04:10:32+5:302019-08-11T04:11:10+5:30
भारताच्या २३ वर्षाआतील संघाने आशियाई व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानवर २१-२५, २५-१६, २५-२२, २५-१८ असा विजय मिळवला.
नवी दिल्ली : भारताच्या २३ वर्षाआतील संघाने आशियाई व्हॉलिबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानवर २१-२५, २५-१६, २५-२२, २५-१८ असा विजय मिळवला. त्यासोबतच भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताचा सामना रविवारी चायनीज तैपेईसोबत होणार आहे. यासह भारताने २३ वर्षाआतील गटाच्या व्हॉलिबॉल विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे. म्यानमारमध्ये ही स्पर्धा खेळली जात आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने पहिला सेट गमावल्यावर पाकिस्तानला २१-२५, २५-१६, २५-२२, २५-१८ अशी मात दिली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर कोणत्याही खेळात भारत-पाकची ही पहिलीच लढत होती.
तिसऱ्या सेटमध्ये शेवटच्या क्षणांमध्ये पाकिस्तानकडे २१-२० अशी आघाडी होती, परंतु त्यांचे तीन फटके बाहेर गेले आणि भारताने २५-२२ अशी बाजी मारली.
त्याआधी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने बलाढ्य आॅस्ट्रेलियाला पिछाडीवरून मात दिली होती.