आशियाई महिला बॉक्सिंग : स्पर्धेआधीच भारताचे एक पदक निश्चित; सीमा पुनिया थेट उपांत्य फेरीत, मेरी कोमवर विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 02:33 AM2017-11-02T02:33:46+5:302017-11-02T02:33:56+5:30
आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेला सुरू होण्याच्या आधीच ड्रॉच्या दिवशी भारताचे एक पदक निश्चित झाले. ८१ किलोंहून अधिक वजनी गटातून थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळालेल्या सीमा पुनियाने भारताचे पदक निश्चित केले.
होचिमिन्ह सिटी (व्हिएतनाम) : आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेला सुरू होण्याच्या आधीच ड्रॉच्या दिवशी भारताचे एक पदक निश्चित झाले. ८१ किलोंहून अधिक वजनी गटातून थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळालेल्या सीमा पुनियाने भारताचे पदक निश्चित केले. त्याच वेळी, ४८ किलो वजनी गटातील हुकमी आणि ५ वेळची जागतिक विजेती एम. सी. मेरी कोम गुरुवारपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
पुनियाच्या वजनी गटात केवळ चार खेळाडूंचा समावेश असल्याने सर्वच खेळाडूंचा थेट उपांत्य फेरीत प्रवेश झाला आहे. सात नोव्हेंबरला पुनिया उझबेकिस्तानच्या गुजाल इस्मातोवाविरुद्ध लढेल. दुसरीकडे, पुनरागमन करीत असलेली आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती मेरी कोमवर सर्वांचे विशेष लक्ष असेल.
मेरी कोमने चार वेळा आशियाई चॅम्पियनशिप पटकावली आहे. त्यामुळे तिच्या प्रदीर्घ अनुभवाचे प्रतिस्पर्ध्यांपुढे कडवे आव्हान असेल. पहिल्या फेरीत दिएम थि त्रिन्ह विरुद्ध लढेल. तसेच ५४ किलो वजनी गटातून सहभागी झालेली दीक्षा मंगोलियाच्या ओयुन एरडेने नरगुइविरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. (वृत्तसंस्था)