आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप : साक्षी, विनेश, दिव्याला रौप्यपदक
By admin | Published: May 13, 2017 01:57 AM2017-05-13T01:57:54+5:302017-05-13T05:10:59+5:30
स्टार मल्ल साक्षी मलिकला शुक्रवारी महिलांच्या ६० किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या रिसाकी कवाईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
नवी दिल्ली : स्टार मल्ल साक्षी मलिकला शुक्रवारी महिलांच्या ६० किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या रिसाकी कवाईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे साक्षीला आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
आॅलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती वर्तुळात पुनरागमन करणारी साक्षी फॉर्मात नसल्याचे चित्र दिसले. साक्षीला रिओ आॅलिम्पिकमध्ये ६३ किलो वजन गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या रिसाकीविरुद्ध २ मिनिट ४४ सेकंदामध्ये १०-० ने पराभव स्वीकारावा लागला.
गेल्यावर्षी रिओमध्ये कांस्यपदकासह आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला मल्ल ठरण्याचा इतिहास नोंदविणाऱ्या साक्षीला प्रतिस्पर्धी जपानच्या महिला मल्लापुढे आव्हान निर्माण करता आले नाही. वजन गट वाढल्यानंतर ५८ किलोच्या स्थानी प्रथमच ६० किलो वजनगटात सहभागी झालेल्या साक्षीला अंतिम फेरीपर्यंत विशेष घाम गाळावा लागला नाही.
२४ वर्षीय साक्षीने उपांत्यपूर्व फेरीत उज्बेकिस्तानच्या नबीरा एसेनबाएव्हाचा ६-२ ने पराभव केला तर उपांत्य फेरीत अयायुलिम कासिमोव्हाविरुद्ध १५-३ ने सहज सरशी साधली.
भारताची अन्य महिला मल्ल विनेश फोगाट हिलाही महिलांच्या ५५ किलो वजन गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिव्या ककरान महिलांच्या ६९ किलो वजन गटात अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.
विनेशची वाटचाल सुरळीत राहिली. महिलांच्या ५५ किलो वजन गटात तिने उपांत्यपूर्व फेरीत उज्बेकिस्तानच्या सेवारा इशमुरातोव्हाचा १०-० ने तर त्यानंतर चीनच्या झांगचा ४-० ने पराभव केला.
दिव्याने अंतिम फेरी गाठताना प्रभावित केले. तिने ताइपेच्या चेन चीविरुद्ध २-० ने तर उपांत्य फेरीत कोरियाच्या हियोनयोंग पार्कचा १२-४ ने पराभव केला.
रितू फोगाटला महिलांच्या ४८ किलो वजन गटात उपांत्य फेरीत जपानच्या युई सुसाकीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पिंकीला महिलांच्या ५३ किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. (वृत्तसंस्था)