आशियाई कुस्ती; साक्षी मलिकचे रौप्यवर समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 02:22 AM2020-02-22T02:22:37+5:302020-02-22T02:23:17+5:30
आशियाई कुस्ती; विनेशसह अन्य दोन महिला मल्लांना कांस्य
नवी दिल्ली : सहजसोपा ड्रॉ मिळूनही आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिक हिला शुक्रवारी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विनेश फोगाट ही पुन्हा एकदा जपानची मायू मुकेदा हिच्याकडून पराभूत झाल्यानंतर तिच्यासह अन्य दोन मल्लांना कांस्यपदक मिळाले. भारताने या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरीसह एकूण ८ पदके जिंकली.
गुरुवारी दिव्या कांकरान, पिंकी आणि सरिता मोर यांनी सुवर्णपदके जिंकली होती. निर्मला देवी दुसऱ्या स्थानी राहिली. शुक्रवारी साक्षीने ६५ गटात रौप्य जिंकले. विनेशला ५३ किलो गटात कांस्य, युवा मल्ल अंशू मलिकला ५७ किलो आणि गुरशरन कौर हिला ७२ किलो वजन गटात कांस्यपदक मिळाले.
साक्षी ही दोनदा जपानची नाओमी रूइके हिच्याकडून सुरुवातीला तसेच अंतिम फेरीत पराभूत झाली. २०१७ ला रौप्य जिंकणाºया साक्षीला या स्पर्धेत दुसऱ्यांदा रौप्य मिळाले. साक्षीला सुरुवातीच्या फेरीत १-२ ने व अंतिम फेरीत ०-२ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. ‘प्रतिस्पर्धी खेळाडू इतकी बलवान नव्हती, मात्र मी तिच्याविरुद्ध एकही गुण मिळवू शकले नाही,’ असे साक्षीने सांगितले.
उझबेकिस्तानची इसेनबायेव्हा हिच्याविरुद्ध उपांत्य फेरीत साक्षी ५-० ने पुढे होती मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूने दोनदा दोन गुणांची कमाई करीत गुणसंख्या ५-४ अशी केली. साक्षीने एका गुणाच्या फरकाने बाजी मारली. अंशू मलिकने ५७ किलो गटात कांस्य जिंकले, तर सोनम मलिकने ६२ किलो गटात लढत गमावली. बिगर आॅलिम्पिकच्या ७२ किलो वजन गटात गुरशरणसिंग कौर हिने मंगोलियाची सेवेगमेड एनखबायर हिचा प्ले आॅफमध्ये पराभव करीत पदक जिंकले.
२०१३ पासून विनेशची पदक कमाई
सर्वांच्या नजरा विनेशच्या कामगिरीकडे होत्या, मात्र ती मुकेदाकडून पराभूत होताच सुवर्णपदकाच्या चढाओढीतून बाहेर पडली. त्यानंतर व्हिएतनामच्या खेळाडूवर विजय नोंदवून विनेशने कांस्य जिंकले. विनेशला जपानच्या खेळाडूचा बलाढ्य बचाव भेदण्यात आजही अपयश आले. सुरुवातीला विनेश वारंवार पायांद्वारे हल्ला चढविण्याचा प्रयत्न करीत होती, मात्र मुकेदाने तिचे प्रयत्न हाणून पाडले. विनेशला २०१३ नंतर प्रत्येकवेळी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळाले आहे.