विनेश फोगाट राजकारणात येणार? शेतकऱ्यांच्या आंदोलनातून तिने एका दगडात दोन पक्षी मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:49 PM2024-08-31T12:49:37+5:302024-08-31T13:14:06+5:30
विनेश फोगाटने शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.
vinesh phogat news : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारी विनेश फोगाट. विनेश भारतात परतल्यावर तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेव्हा काँग्रेस नेते तिच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यामुळे विनेश लवकरच राजकारणात प्रवेश करेल अशी अटकळ बांधली जात होती. विनेशने या विषयावर आतापर्यंत मौन बाळगले होते. आज शनिवारी ती शंभू बॉर्डवर शेतकरी आंदोलनात सहभागी झाली. यावेळी विनेशला राजकारणाबाबत प्रश्न केला असता, तिने निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले.
काँग्रेसने तिकीट दिल्यास हरियाणाची निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विनेश फोगाटला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना विनेश म्हणाली की, मी निवडणूक लढवण्याबाबत काहीही बोलणार नाही. मी इथे राजकारणावर भाष्य करणार नाही. मी माझ्या कुटुंबात आले आहे. इथे तुम्ही राजकारणाबद्दल बोलाल तर तुम्ही शेतकऱ्यांचा लढा आणि संघर्ष उद्ध्वस्त करत आहात. त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे. आज सर्व लक्ष माझ्याकडे नसून यांच्याकडे द्यायला हवे. एकूणच विनेशने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर फोकस करण्याचे आवाहन केले.
विनेशचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सहभाग
तसेच मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, मी एक ॲथलीट आहे. मी संपूर्ण देशाची आहे. कोणत्या राज्यात निवडणूक होत आहे याच्याशी माझा काहीच संबंध नसतो. मला फक्त एवढेच माहिती आहे की, आपल्या देशातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्या समस्यांवर सरकारने तोडगा काढायला हवा. सरकारने या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे, असेही विनेश फोगाटने सांगितले.
विनेश फोगाट पुढे म्हणाली की, शेतकऱ्यांना इथे आंदोलनस्थळी बसून २०० दिवस झाले आहेत. हे पाहून फार वाईट वाटते. ते सर्व या देशाचे नागरिक आहेत. शेतकरी देश चालवतात. त्यांच्याशिवाय काहीही शक्य नाही, अगदी खेळाडूंनाही शेतकऱ्यांशिवाय पुढे जाता येत नाही. जर त्यांनी आमच्यासाठी धान्य पिकवले नाही तर आम्ही स्पर्धा करू शकणार नाही. खेळाडू म्हणून आम्ही देशाचे इतक्या मोठ्या स्तरावर प्रतिनिधित्व करतो, पण आपल्या कुटुंबासाठी काही करू शकत नाही, त्यांना दुःख झालेले पाहूनही आम्ही काहीच करू शकत नाही. मी सरकारला त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती करते. गेल्या वेळी सरकारने आपली चूक मान्य केली होती. आता त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. शेतकरी असेच रस्त्यावर बसले तर देशाची प्रगती होणार नाही.