तिरंदाजीत अतानू दासचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
By admin | Published: August 10, 2016 06:47 AM2016-08-10T06:47:18+5:302016-08-10T06:47:18+5:30
सामना जिंकण्यासाठी अतानूला आपल्या शेवटच्या प्रयत्नात १० गुणांची कमाई करून देणारा अचूक वेध हवा होता. अतानूने या क्षणी कोणताही दबाव निर्माण न होऊ देता अचूक लक्ष्यवेध साधला आणि सामना जिंकला.
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १० :भारतीय तिरंदाज अतानू दासने रिओ ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या वैयक्तिक गटात संघर्षपूर्ण विजय प्राप्त करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अतानूने मोक्याच्या क्षणी उल्लेखनीय कामगिरी उंचावत क्यूबाच्या प्युएनतिस पेरेझ आद्रियन आंद्रेस याला पाच सेटच्या चुरशीच्या लढाईत ३-२ असे पराभूत केले. सामन्याच्या अखेरच्या दोन निर्णायक सेटमध्ये अतानूने अचूक लक्ष्यवेध साधून मात केली.
अतानूने सुरूवातीचे दोन सेट जिंकून आघाडी घेतली होती. पण पुढील दोन सेट अतानूने एका गुणाच्या फरकाने गमावले होते. पाचव्या सेटच्या पहिल्याच प्रयत्नात आंद्रेस याने ९ गुण कमावले. त्यानंतर अतानूने दुसऱ्या प्रयत्नात अचून लक्ष्यवेध साधून १० गुण पटकावले. त्यामुळे अतानूला प्रतिस्पर्धी खेळाडूवर दडपण आणता आले.
अटीतटीच्या लढतीत आंद्रेसनेही दमदार प्रत्युत्तर देत पुढच्याच प्रयत्नात ९ गुणांची कमाई केली. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी अतानूला आपल्या शेवटच्या प्रयत्नात १० गुणांची कमाई करून देणारा अचूक वेध हवा होता. अतानूने या क्षणी कोणताही दबाव निर्माण न होऊ देता अचूक लक्ष्यवेध साधला आणि सामना जिंकला.