फाॅर्म्युला १ चॅम्पियन होण्याचे स्वप्न पाहणारा अथर्व; पहिला मराठमाेळा फाॅर्म्युला कार रेसर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 12:53 PM2022-06-26T12:53:52+5:302022-06-26T12:54:17+5:30
अथर्वने ‘लाेकमत’शी बाेलताना त्याच्या स्वप्नाविषयी सांगितले. ताे म्हणताे, मला फाॅर्म्युला १ शर्यतीमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
तरुणाईला एका गाेष्टीचे माेठे आकर्षण असते, ते म्हणजे वेग! या वेगावर स्वार हाेऊन एक मराठमाेळा तरुण फाॅर्म्युला वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पाहात आहे. त्याचे नाव आहे अथर्व देसाई. वयाच्या सातव्यावर्षीच ताे वेगाशी स्पर्धा करू लागला. सर्वप्रथम २००८ मध्ये गाे-कार्टद्वारे या अथर्व रेसिंग ट्रॅकवर उतरला. तेव्हापासून त्याने या प्रकारातील अनेक शर्यती जिंकल्या आहेत. आता त्याची नजर भारतात यावर्षाअखेरीस हाेणाऱ्या फाॅर्म्युला शर्यतींवर आहे.
अथर्वने ‘लाेकमत’शी बाेलताना त्याच्या स्वप्नाविषयी सांगितले. ताे म्हणताे, मला फाॅर्म्युला १ शर्यतीमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राची माती शाैर्य आणि त्यागासाठी ओळखली जाते. माझी पाळेमुळे या मातीतच रुजली असल्याने मला चॅम्पियनशिप जिंकून देशाचा गाैरव वाढविण्यासाठी प्रेरणा मिळत राहते.
अथर्वला पहिल्या एफआयए चॅम्पियनशिपसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा फाॅर्म्युला रिजनल युराेप अणि अमेरिकेशी समतुल्य आहे. बुद्ध इंटरनॅशनल सर्किटपासून नाेव्हेंबर महिन्यात स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. त्यानंतर हैदराबाद, चेन्नई आणि काेईम्बतूर या शहरांमध्ये स्पर्धेचे वेगवेगळे टप्पे पार पडणार आहेत. अथर्व त्यात सहभागी हाेण्याची शक्यता आहे.
अल्पावधीतच माेठे यश
गाे-कार्टींगनंतर अथर्वने २०१७ मध्ये फाॅर्म्युला ४ प्रकारांत पाऊल ठेवले. त्यानंतर फाॅर्म्युला ३ या प्रकारात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच अथर्वने माेठे यश मिळविले. त्याची ‘यंग रेसिंग ड्रायव्हर अकॅडमी’मध्ये निवड झाली असून, तेथे ताे प्रशिक्षण घेत आहेत.
फाॅर्म्युला १ रेसिंगचे स्वप्न उराशी बाळगल्यानंतर अथर्व आता ऑक्सफाेर्ड येथे माेटरस्पाेर्ट टेक्नाॅलाॅजीमध्ये अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात शिकत आहे.