कुस्ती, फुटबॉलपाठोपाठ नेमबाजीत कोल्हापूर जगाच्या नकाशावर

By संदीप आडनाईक | Published: August 2, 2024 01:44 PM2024-08-02T13:44:54+5:302024-08-02T13:48:27+5:30

जयसिंहराव कुसाळे नेमबाजीचे प्रेरणास्थान : १९५८ पासून खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास

Athletes brought the name of Kolhapur on the world map in wrestling, football, sports and shooting | कुस्ती, फुटबॉलपाठोपाठ नेमबाजीत कोल्हापूर जगाच्या नकाशावर

कुस्ती, फुटबॉलपाठोपाठ नेमबाजीत कोल्हापूर जगाच्या नकाशावर

संदीप आडनाईक

कोल्हापूर : क्रीडानगरी कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर सातत्याने गाजते आहे. कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, हॉकी खेळापाठोपाठ नेमबाजीतही येथील खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत कोल्हापुरचे नाव जगाच्या नकाशावर आणलेले आहे. जिल्ह्यातील राधानगरीचा नेमबाज २८ वर्षीय स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर एअर रायफल नेमबाजीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत कास्यपदक पटकावल्यामुळे नेमबाजीत कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराच रोवला आहे.

नेमबाजीत कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर आणण्याचे काम जयसिंहराव कुसाळे यांनी १९५८ मध्ये सर्वप्रथम केले. कुसाळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत दोन हजारांवर नेमबाजांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. जयसिंहराव कुसाळे यांना नेमबाजीतील कामगिरीबद्दल १९७६-७७ आणि पाठोपाठ १९७७-७८ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराचा बहुमान त्यांचे चिरंजीव रमेश यांनाही १९ व्या वर्षी मिळाला. एकाच घरात लागोपाठ दोन वर्षे पितापुत्रांना हा पुरस्कार मिळण्याचे हे अपवादात्मक उदाहरण आहे.

नेमबाजीत कोल्हापूरकर पुढेच

नेमबाजीत कोल्हापूरच्या बाळासाहेब पिरजादे, मंझील हकीम, प्रताप इंगळे, ऋतुराज इंगळे, सागर शेळके, राजेंद्र डफळे, संजय पाटील, रवी पाटील, नवनाथ फडतारे, संदीप तरटे, फुलचंद बांगर, मनमित राऊत, कनय्या बाबर, जितेंद्र विभुते, युवराज चौगुले, महादेव गायकवाड, राठोड या नेमबाजांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळविली. १९८२ मध्ये अजित खराडे, शिवराज सुर्वे या नेमबाजांसह रमेश कुसाळे यांनी अमेरिका दौरा केला. १९८२ मध्ये दिल्ली येथील नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही रमेश यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यावर्षी पुन्हा त्यांची निवड ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथे झालेल्या १२ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत झाली. २००१ पासून गेली १९ वर्षे ते अजित खराडे, रमेश कुसाळे, प्रमोद पाटील, अजित पाटील, कल्पना कुसाळे, युवराज साळोखे, दीपक चव्हाण यांच्या सहकार्याने नवोदित नेमबाजांसाठी प्रशिक्षण शिबिर घेतात. कोल्हापूरच्याच राधिका बराले-हवालदार हिने कोलंबो (श्रीलंका) येथील २१ ऑगस्ट २००६ मध्ये दक्षिण आशियाई गेम्समध्ये १० मीटर एअररायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. २०१५ नंतर अभिज्ञा पाटीलनेही ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत पदक पटकावले.

तेजस्विनी, राही सरनोबत, शाहू माने यांचीही दमदार कामगिरी

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनी सावंत हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात विजेतेपद पटकावणारी ती पहिली महिला भारतीय ठरली. राही सरनोबत ही २२ ऑगस्ट २०१८ मध्ये एशियाडमध्ये १० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली. २०१८ मध्ये कोल्हापूरच्या शाहू तुषार माने या १७ वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाने अर्जेंटिना (ब्युईनस एअरज) येथील युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेची चॅम्पियन राही सरनोबतने २०२१ मध्ये नवी दिल्लीतील ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावून सुवर्णपदक पटकावले. 

२०२२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा अशोक पाटील हिने २५ मीटर स्पोर्टस पिस्तूल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. यापूर्वी तिने आशियाई स्पर्धेत कांस्य, तर जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. स्वप्निल कुसाळे यानेही २०२२ मध्ये एशियन गेम्समध्ये सांघिक सुवर्णपदक मिळवलं होतं. गोखले कॉलेजच्या अनुष्का पाटीलने सांघिक युवा गटात १० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. २०२४ मध्येच सोनम म्हसकरने विश्वचषक नेमबाजीत १० मीटर एअर रायफल्समध्ये रौप्यपदक पटकावले.

Web Title: Athletes brought the name of Kolhapur on the world map in wrestling, football, sports and shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.