World Athletics Championships, Annu Rani : शेतकऱ्याच्या पोरीनं इतिहास घडविला, भालाफेकीतील 'राणी'नं जागतिक स्पर्धेत तिरंगा डौलाने फडकवला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 09:10 AM2022-07-21T09:10:05+5:302022-07-21T09:16:59+5:30
World Athletics Championships, Annu Rani : उत्तर प्रदेशच्या बहादूरपूर गावातील २९ वर्षीय अनु राणीने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली.
World Athletics Championships, Annu Rani : उत्तर प्रदेशच्या बहादूरपूर गावातील २९ वर्षीय अनु राणीने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली. २८ ऑगस्ट १९९२मध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनुला तिचा भाऊ उपेंद्र याने भालाफेकीचे प्रशिक्षण दिले. सुरुवातीला तिला ऊसाचा बांबू फेकण्यास लावून ट्रेनिंग दिली. भाला खरेदी करण्याइतके पैसेही या कुटुंबाकडे नसल्याने अनु बांबूलाच भाला समजून सराव करायची. वयाच्या १८व्या वर्षी तिने भालाफेकीला सुरुवात केली. वडिलांचा तीव्र विरोध झुगारून भाऊ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. २०१४मध्ये तिने प्रथम राष्ट्रीय विक्रम मोडला आणि त्यानंतर ८ वेळा राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावावर केले. आज त्याच अनुने जागतिक स्पर्धेत कमाल करून दाखवली.
India at World Athletics Championships: अनु राणीने महिलांच्या भालाफेकीच्या पात्रता स्पर्धेत ५९.६० मीटर लांब भालाफेकून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आल्यानंतर अनुने तिसऱ्या प्रयत्नात जोर लावला अन् अंतिम फेरीतील जागा पक्की केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. गत जागतिक स्पर्धेतही तिने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
Women's Javelin Throw at #WorldAthleticsChamps Live tomorrow morning at 5:20am IST on #SonyLiv
— Athletics Federation of India (@afiindia) July 20, 2022
Annu Rani has broken her national record 🇮🇳 a whopping 8 times so far!
But do you remember which year and what distance she first measured to disturb the record books? pic.twitter.com/l00m1fD41O
२३ तारखेला होणाऱ्या अंतिम फेरीत पदक पटकावण्यासाठी तिला ६५ मीटरचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवावे लागेल. अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या १२ खेळाडूंमध्ये हरुका कितागुचीने ६४.३२ मीटर लांब भालाफेकून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर शियिंग लियू व लिव्हेता जासीयनैटे यांनी अनुक्रमे ६३.८६ मीटर व ६३.८० मीटर लांब भालाफेक केली. ६३.२४ मीटर हा अनु राणीचा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे.