खेळाडूचा संघर्ष पाहणे प्रेक्षकांना आवडेल
By admin | Published: December 24, 2015 01:18 AM2015-12-24T01:18:01+5:302015-12-24T01:18:01+5:30
मागील सप्टेंबरमध्ये बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आपल्या जीवनावर चित्रपट तयार व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. तिची ही इच्छा लवकरच पूर्णत्वास येत आहे.
मागील सप्टेंबरमध्ये बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आपल्या जीवनावर चित्रपट तयार व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. तिची ही इच्छा लवकरच पूर्णत्वास येत आहे. हा चित्रपट अमोल गुप्ते दिग्दर्शित करणार आहेत. त्यांच्या चमूने नुकतीच हैदराबाद येथे सायनाची भेट घेतली. एखाद्या खेळाडूचा संघर्ष आणि यश रुपेरी पडद्यावर पाहायला नव्या पिढीला नक्की आवडेल, असा विश्वास सायनाने यावेळी व्यक्त केला. आपल्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोन योग्य असल्याचे यापूर्वी सायनाने म्हटले होते, मात्र निर्णय प्रक्रियेत आपल्याला पडायचे नाही. चित्रपट निर्मात्यांनी याविषयी निर्णय घ्यावा, असे तिने आता सांगितले आहे. सायना म्हणाली, मी खेळ आणि प्रशिक्षण हे माझे काम करीत राहणार. निर्माते त्यांचे काम करतील. माझा त्यात कसलाही हस्तक्षेप राहणार नाही. अमोल गुप्ते यांचे काम मी पाहिले आहे आणि त्यांच्या हातून एका श्रेष्ठ चित्रपटाची निर्मिती होईल, अशी मला आशा आहे. मला चित्रपटाविषयी फार काही माहिती नाही, पण अमोल गुप्ते यांच्या चित्रपटांची नेहमीच प्रशंसा झाली आहे. हा चित्रपटही नक्कीच दाद घेईल, अशी अपेक्षा आहे.