आॅस्ट्रेलियाला इंग्लंड व ‘पावसाचे’आव्हान
By admin | Published: June 10, 2017 04:44 AM2017-06-10T04:44:47+5:302017-06-10T04:55:40+5:30
मागच्या दोन्ही सामन्यात पावसाचा फटका बसलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला आज शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ या
बर्मिंघम : मागच्या दोन्ही सामन्यात पावसाचा फटका बसलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला आज शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडसह पुन्हा एकदा पावसाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
इंग्लंडने आधीच उपांत्य फेरी गाठली. अशावेळी दडपण आॅस्ट्रेलियावर असेल. न्यूझीलंड आणि बांगला देशविरुद्धचे सामने पावसात धुतले गेल्याने आॅस्ट्रेलियाला केवळ दोन गुणांवर समाधान मानावे लागले. एकही सामना पूर्ण झाला नसल्याने उपांत्य फेरीच्या आशा अधांतरी आहेत. एजबस्टनमध्ये खेळविण्यात आलेले तिन्ही सामने पावसामुळे प्रभावित झाले. आजही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान चांगले असले तरी आॅस्ट्रेलियापुढे इंग्लंडचे बलाढ्य आव्हान राहील. आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना क्रिझवर स्थिरावण्याची पुरेशी संधी अद्यापतरी मिळालेली नाही. आॅस्ट्रेलियन फलंदाजांना इंग्लंडचा मारा खेळणे वाटते तितके सोपे जाणार नाही. डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच आणि स्टीव्हन स्मिथ यांचा अपवाद वगळता मधल्या फळीतील फलंदाजांना तर सरावाची देखील पुरेशी संधी लाभलेली नाही. गोलंदाजीत या संघाने बांगलादेशला १८२ धावांत बाद केले होते. त्या सामन्यात मिशेल स्टार्कने चार बळी घेतले तसेच जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांची त्याला चांगली साथ लाभली होती. लेगस्पिनर अॅडम झम्पा याने चार षटकांच्या गोलंदाजीत दोन गडी बाद केले. इंग्लंडने दोन्ही सामन्यात ३०० वर धावा फळ्यावर लावल्याने त्यांच्या फलंदाजांना रोखण्याचे उपाय आॅस्ट्रेलियाला शोधावे लागणार आहेत.
इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सने न्यूझीलंडविरुद्ध स्पर्धेत दुसरे अर्धशतक ठोकले तर ज्यो रुटने बांगलादेश्विरुद्ध नाबाद १३३ धावांची खेळी केली. जेसन राय याने मात्र एकही मोठी खेळी केलेली नाही. आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज हसीच्या मते आॅस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड विजयाचा दावेदार म्हणून सुरुवात करेल. हसी पुढे म्हणाला,‘दोन्ही संघांमधील कडवी स्पर्धा जुनीच आहे. मोठ्या सामन्यात इंग्लंड आॅस्ट्रेलियावर नेहमी वरचढ ठरतो. या सामन्यातही आॅस्ट्रेलिया बाहेरचा रस्ता दाखविण्यात इंग्लंड कसर शिल्लक राखणार नाही, असा मला विश्वास आहे.’(वृत्तसंस्था)
उभय संघ यातून निवडणार-
आॅस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅरोन स्मिथ, पॅट कमिन्स, जॉन हेस्टिंग्स, जोश हेजलवूड, ट्रेव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स पॅटिनसन, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा.
इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टॉ, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, अॅलेक्स हेल्स, जोस बटलर, लियाम प्लंकेट, आदील राशिद, ज्यो रुट, जेसन राय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, स्टीवन फिन.