आॅस्ट्रेलियाचा २-० ने मालिका विजय
By admin | Published: January 10, 2015 11:40 PM2015-01-10T23:40:19+5:302015-01-10T23:40:19+5:30
भारताने सिडनी क्रिकेट मैदानावर पाचव्या व अखेरच्या दिवशी विषम परिस्थितीत आॅस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा व अखेरचा कसोटी सामना अखेर अनिर्णीत राखण्यात यश मिळविले.
चौथा कसोटी सामना अनिर्णीत : विराट, विजय, रहाणे यांची संयमी खेळी
सिडनी : भारताने सिडनी क्रिकेट मैदानावर पाचव्या व अखेरच्या दिवशी विषम परिस्थितीत आॅस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा व अखेरचा कसोटी सामना अखेर अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. यजमान संघ मालिकेत २-० ने विजय मिळविण्यात यशस्वी ठरला.
आॅस्ट्रेलियाने दिलेल्या ३४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. अखेरच्या सत्रात नियमित कालावधीत विकेट गमावल्यामुळे भारतीय संघाला अखेर ८९.५ षटकांत ७ बाद २५२ धावांची मजल मारता आल्यामुळे अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले. चहापानाला खेळ थांबला, त्या वेळी भारतीय संघ २ बाद १६० अशा दमदार स्थितीत होता. या वेळी अखेरच्या सत्रात भारताला ३३ षटकांत विजयासाठी १८९ धावांची गरज होती. अखेरच्या सत्रात मात्र चित्र पालटले. मुरली विजय (८०), फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहली (४६), सुरेश रैना (०), रिद्धिमान साहा (०) आणि रविचंद्रन आश्विन (१) हे एकापाठोपाठ माघारी परतल्यामुळे आॅस्ट्रेलिया संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. पण, अजिंक्य रहाणे (नाबाद ३८) व भुवनेश्वर कुमार (नाबाद २०) यांनी दडपणाखाली संयमी फलंदाजी करून जवळजवळ १२ षटके खेळून काढली व सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आॅस्ट्रेलियाने अॅडिलेड व ब्रिस्बेन कसोटी सामन्यांत विजय मिळवून मालिकेत २-० ने सरशी साधली आणि बॉर्डर-गावसकर चषकावर पुन्हा एकदा नाव कोरले. मेलबोर्नमध्ये खेळल्या गेलेला बॉक्सिंग डे कसोटी सामना अनिर्णीत संपला. आॅस्ट्रेलियातर्फे जोश हेजलवूड (३१ धावा), मिशेल स्टार्क (३६ धावा) व आॅफ स्पिनर नॅथन लियोन (११० धावा) यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
त्याआधी, आॅस्ट्रेलियाने दुसरा डाव कालच्या ६ बाद २५१ धावसंख्येवर घोषित केली आणि भारतापुढे ९० षटकांत ३४९ धावा फटकाविण्याचे कडवे आव्हान ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना युवा सलामीवीर लोकेश राहुल (१६) झटपट माघारी परतला. त्यानंतर मुरली विजय व रोहित शर्मा (३६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करून डाव सावरला. विजय व राहुल यांनी भारताला सावध सुरुवात करून दिली. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने सहाव्या षटकात फिरकीपटू लियोनला पाचारण केले. संघर्ष करीत असलेला राहुल लियोनच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड शॉर्ट लेगला तैनात डेव्हिड वॉर्नरकडे झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर खेळपट्टीवर आलेला रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर सुदैवी ठरला. रोहितने डावाच्या २४व्या षटकात लियोनच्या गोलंदाजीवर चौकार व षटकार वसूल केले. त्याने विजयच्या साथीने उपाहारापर्यंत भारताला १ बाद ७३ धावांपर्यंत मजल मारून दिली.
उपाहारानंतर रोहितला अधिक काळ टिकाव धरता आला नाही. शेन वॉटसनने रोहितला तंबूचा मार्ग दाखविला. त्याचा उडालेला झेल स्लिपमध्ये तैनात कर्णधार स्मिथने अप्रतिमरीत्या टिपला. रोहितने ९० चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३९ धावा फटकावल्या. त्यानंतर विजयची साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आलेल्या कोहलीने संयमी फलंदाजी केली. विजय वैयक्तिक ४२ धावांवर असताना सुदैवी ठरला.
त्यानंतर पुढच्या षटकात विजय पुन्हा सुदैवी ठरला. त्या वेळी पंच रिचर्ड कॅटलब्रा यांनी हेजलवूडच्या गोलंदाजीवर विजयविरुद्धच्या पायचितचे अपील फेटाळून लावले. रिप्लेमध्ये विजय बाद असल्याचे दिसून येते होते. भारताला अखेरच्या सत्रात विजयासाठी १८९ धावांची गरज होती व ८ विकेट शिल्लक होत्या. विजय यष्टिरक्षक हॅडीनकडे झेल देत माघारी परतला. विजयने कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)
धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव ) ७ बाद २७२ (डाव घोषित). भारत पहिला डाव : ४७५. आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : ६ बाद २५१ (डाव घोषित).
भारत दुसरा डाव : मुरली विजय झे. हॅडीन गो. हेजलवूड ८०, लोकेश राहुल झे. वॉर्नर गो. लियोन १६, रोहित शर्मा झे. स्मिथ गो. वॉटसन ३९, विराट कोहली झे. वॉटसन गो. स्टार्क ४६, अजिंक्य रहाणे नाबाद ३८, सुरेश रैना पायचित गो. स्टार्क ०, रिद्धिमान साहा पायचित गो. लियोन ०, रविचंद्रन आश्विन पायचित गो. हेजलवूड १, भुवनेश्वर कुमार नाबाद २०. अवांतर (१२). एकूण ८९.५ षटकांत ७ बाद २५२. बाद क्रम : १-४८, २-१०४, ३-१७८, ४-२०१, ५-२०३, ६-२०८, ७-२१७. गोलंदाजी : स्टार्क १९-७-३६-२, हॅरिस १३-३-३४-०, लियोन ३०.५-५-११०-२, हेजलवूड १७-७-३१-२, स्मिथ २-०-७-०, वॉटसन ८-२-२२-१.
5870
भारत आणि आस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी ५,८७० धावा काढल्या गेल्या. २००३-०४ मध्ये बोर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेत या दोन्ही संघांनी ५६५१ धावा काढल्या होत्या, त्या दुसरी क्रमांकाच्या ठरल्या.
692विराट कोहली याने या मालिकेत ६९२ धावा काढल्या. आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायभूमीत (विदेशात) मालिकेत सर्वोच्च धावा काढणारा तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी ७०० पेक्षा अधिक धावा काढण्याची कामगिरी १९७१ आणि १९७८-७९ च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत केली होती.
1एका कसोटीत पहिल्या सात फलंदाजातील शून्यावर दोनदा बाद होण्याची दुहेरी कामगिरी करणारा सुरेश रैना एकमेव ठरला. यापूर्वी मोहिंदर अमरनाथ यांच्या नावावर वेस्ट इंडिजविरुद्ध कानपूर आणि कोलकातामधील अशा कामगिरीची नोंद आहे.
5 सलामीवीर मुरली विजय हा पाचवेळा
५० पेक्षा अधिक धावा करणारा सलामीचा फलंदाज ठरला. तर यापूर्वी गावस्कर आणि कृष्णमचारी श्रीकांत यांच्यानंतर ही तिसरी कामगिरी नोंदली गेली आहे. त्यांनी अनुक्रमे १९७७-७८ आणि १९८५-८६ मध्ये ही कामगिरी नोंदली.
2 वीस वर्षांत सिडनी मैदानावर २२ कसोटी सामने खेळले गेले. त्यापैकी येथे आॅस्ट्रेलिया १७ वेळा विजयी ठरली. तीन कसोट्या त्यांनी गमावल्या, तर दोन अनिर्णीत राहिल्या. अनिर्णीत कसोटी राहिल्या त्याही भारताविरुद्धच (२००४, २०१५).
6 आस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लियॉन हा सहावेळा १०० पेक्षा अधिक धावा देणारा गोलंदाज ठरला. ५६ वर्षांपूर्वी १९५८-५९ मध्ये एखादा गोलंदाजाने मालिकेत १०० पेक्षा अधिक धावा देण्याची नोंद यापूर्वी भारताच्या सुभाष गुप्ता यांच्या नावावर होती. वेस्ट इंडिज दौऱ्यात त्यांची गोलंदाजी महाग पडली होती.
5सुरेश रैना शेवटच्या सात कसोटी सामन्यात पाचवेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला. यापूर्वी इंग्लंडमध्ये २०११ च्या दौऱ्यात ओवल कसोटीत दोनवेळा आणि मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू येथे २०१२ मध्ये तो दोनवेळा शुन्यावर बाद झाला.
482 या मालिकेत मुरली विजयने सलामीला येऊन ४८२ धावा काढल्या. विदेशात सलामीला सर्वोच्च धावा नोंदविण्यात तो तिसरा ठरला आहे. यापूर्वी गावस्कर यांनी १९७९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ५४२ आणि १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७७४ धावा काढल्या होत्या.
50 मिचेल स्टार्कने कसोटीत ५० बळी पूर्ण करण्याची किमया साधली. त्याने रैनाला शून्यावर बाद करण्याची मौलिक कामगिरी केली. आॅस्ट्रेलियाकडून अशी कामगिरी करणारा ७२ वा गोलंदाज ठरला.
रैना पुन्हा अपयशी
सुरेश रैना कारकिर्दीतील अखेरच्या सात कसोटी सामन्यांतील पाच डावांमध्ये शून्यावर बाद झाला आहे. २०११मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी सामन्यात दोनदा, तर २०१२मध्ये न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटी सामन्यात एकदा शून्यावर बाद झाला आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो दोनदा शून्यावर बाद झाला. भारताच्या अव्वल सात फलंदाजांमध्ये रैनापूर्वी मोहिंदर अमरनाथ १९८३मध्ये कानपूर व कोलकाता कसोटी सामन्यांत वेस्ट इंडीजविरुद्ध चारवेळा शून्यावर बाद झाला आहे.
खेळपट्ट्या अपेक्षेप्रमाणे
भंग झाल्या नाहीत : स्मिथ
भारताविरुद्धच्या मालिकेत खेळपट्ट्या अपेक्षेप्रमाणे भंग झाल्या नाही. त्यामुळे यजमान संघाचे मोठ्या फरकाने विजय मिळविण्याचे स्वप्न भंगले, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केली. भारताविरुद्ध चौथा कसोटी सामना पाचव्या व अखेरच्या दिवशी शनिवारी अनिर्णीत संपल्यानंतर स्मिथ पत्रकार परिषदेत बोलत होता. अॅडिलेड व ब्रिस्बेन कसोटी सामन्यांत विजय मिळविल्यानंतर यजमान आॅस्ट्रेलिया संघाला उर्वरित दोन्ही सामन्यांत पाहुण्या संघाचे २० बळी मिळविण्यात अपयश आले.
त्यामुळे आॅस्ट्रेलिया संघाला
२-०ने विजयावर समाधान मानावे लागले.