आॅस्ट्रेलियाने मालिकेवर छाप सोडली
By admin | Published: March 6, 2017 12:06 AM2017-03-06T00:06:53+5:302017-03-06T00:06:53+5:30
सध्या खेळल्या जात असलेल्या मालिकेमध्ये जास्तीत जास्त सत्रांमध्ये आॅस्ट्रेलिया संघाने वर्चस्व गाजवले.
-रवी शास्त्री लिहितो...
सध्या खेळल्या जात असलेल्या मालिकेमध्ये जास्तीत जास्त सत्रांमध्ये आॅस्ट्रेलिया संघाने वर्चस्व गाजवले. बेंगळुरुतील दुसरा दिवस काही वेगळा नव्हता. ते निखाऱ्यावर चालण्यासाठी सज्ज होते. येथील परिस्थितीची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी संथगतीने धावा केल्या. नैसर्गिक आक्रमक शैलीला मुरड घालत त्यांनी बचावात्मक पवित्रा स्वीकारला. कसोटी मालिकेच्या निर्णायक दिवशी त्यांनी वर्चस्व गाजवले.
भारतीय संघ निश्चितच दडपणाखाली आहे. अनेकदा क्षेत्ररक्षक चुका करीत असून डीआरएस घेण्यात डोके काम करीत नसल्याचे चित्र आहे. फलंदाजांच्या आजूबाजूला क्षेत्ररक्षक थकलेले दिसत आहेत. गोलंदाजांची कामगिरी मात्र प्रभावित करणारी होती. अडचणीच्या परिस्थितीत त्यांनी खांदे न झुकवता आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित कुठल्याही निष्पक्ष पर्यवेक्षकाला याची नोंद घेता आली असती.
उमेश यादव व ईशांत शर्माची जोडी शानदार होती. आॅस्ट्रेलियाचा प्रत्येक फलंदाज ‘अभेद्य भिंत’ म्हणूनच मैदानात दाखल होत होता. आॅस्ट्रेलियाची फलंदाजी केवळ वॉर्नर किंवा स्मिथवर अवलंबून नसल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक फलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या रणनीतीला उत्तर देण्यास सज्ज असल्याचे दिसून आले. त्यांनी भारतीय संघाला चोख उत्तर देण्याचा निर्धार केला आहे.
उंच चणीचा युवा सलामीवीर मॅट रेनशॉने सर्वांना प्रभावित केले. त्याचा आपल्या फुटवर्कवर विश्वास आहे. आव्हानात्मक परिस्थिती असली तरी त्याचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्याने महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर शॉन मार्श आणि मॅथ्यू वेड यांनी लढवय्या खेळी करीत सामन्याला निर्णायक वळणावर पोहचविले.
सध्याची स्थिती बघता भारताच्या आघाडीच्या फळीला चांगली फलंदाजी करावी लागेल. आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव अद्याप संपलेला नाही. झपाट्याने रंग बदलत असलेल्या खेळपट्टीवर प्रत्येक धाव मोलाची आहे. (टीसीएम)