आॅस्ट्रेलिया-इंग्लंड सलामी लढत आज
By Admin | Published: January 16, 2015 03:55 AM2015-01-16T03:55:02+5:302015-01-16T03:55:02+5:30
आॅस्ट्रेलियात शुक्रवारपासून तिरंगी मालिकेला प्रारंभ होत असून या सहभागी संघांना विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्याची चांगली संधी मिळणार आहे.
सिडनी : आॅस्ट्रेलियात शुक्रवारपासून तिरंगी मालिकेला प्रारंभ होत असून या सहभागी संघांना विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्याची चांगली संधी मिळणार आहे. आॅस्ट्रेलिया व इंग्लंड संघांदरम्यान शुक्रवारी तिरंगी मालिकेची सलामीची लढत रंगणार आहे.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेत २-० ने विजय मिळविणाऱ्या यजमान आॅस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. शुक्रवारी आॅस्ट्रेलियाला इंग्लंडच्या तर त्यानंतर रविवारी मेलबर्नमध्ये सध्याचा विश्वविजेता असलेल्या भारताच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. तिरंगी मालिकेतील तिन्ही संघांतील खेळाडूंना सूर गवसण्यासाठी व विश्वकप संघात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.
इंग्लंडसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे; कारण इंग्लंड संघ नवा कर्णधार इयान मोर्गनच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.
इंग्लंडने विश्वकप स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना अॅलिस्टर कुकच्या स्थानी मॉर्गनकडे कर्णधारपद सोपविण्याचा निर्णय घेतला. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने कॅनबेरामध्ये खेळल्या गेलेल्या दोन सराव सामन्यांत चमकदार कामगिरी करताना एकूण ७५५ धावा फटकाविल्या. पण कर्णधार मॉर्गनचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याला गेल्या १९ वन-डे डावांमध्ये केवळ एकदा अर्धशतकाची वेस ओलांडता आली.
दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलियाचा विश्वकपच्या प्रबळ दावेदारांमध्ये समावेश आहे,
पण या मालिकेत आॅस्ट्रेलिया
संघ कर्णधार मायकल क्लार्कविना उतरणार आहे. क्लार्क स्नायूच्या दुखापतीमुळे त्रस्त असून, तो
अनेक दिवसांपासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे.
क्लार्कच्या अनुपस्थितीत आॅस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार जॉर्ज बेली संघाचे कर्णधारपद सांभाळणार असून, स्टीव्ह क्लार्क संघाचा उपकर्णधार राहील. (वृत्तसंस्था)