आॅस्ट्रेलिया-इंग्लंड जेतेपदासाठी झुंजणार
By admin | Published: January 31, 2015 11:20 PM2015-01-31T23:20:24+5:302015-01-31T23:20:24+5:30
रविवारी तिरंगी वन-डे सामन्यांच्या मालिकेच्या अंतिम लढतीत यजमान आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यादरम्यान जेतेपदासाठी अंतिम झुंज रंगणार आहे.
तिरंगी मालिका : अंतिम लढत आज
पर्थ : विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत खेळण्यापूर्वी रविवारी तिरंगी वन-डे सामन्यांच्या मालिकेच्या अंतिम लढतीत यजमान आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यादरम्यान जेतेपदासाठी अंतिम झुंज रंगणार आहे. रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीकडे उभय संघ विश्वकप स्पर्धेसाठी सरावाची उत्तम संधी म्हणून बघत आहेत.
चार सामन्यांत १५ गुणांची कमाई करणाऱ्या जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलिया संघाला तिरंगी स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मिशेल जॉन्सन फिट असून रविवारच्या सामन्यात खेळणार असल्याचे वृत्त आहे. जॉन्सनच्या समावेशामुळे आॅस्ट्रेलियाची गोलंदाजीची बाजू अधिक मजबूत झाली आहे. नियमित कर्णधार मायकल क्लार्कच्या अनुपस्थितीतही आॅस्ट्रेलिया संघ बलाढ्य भासत आहे. तिरंगी मालिकेत आॅस्ट्रेलियाची फलंदाजी व गोलंदाजी उल्लेखनीय ठरली आहे. कर्णधार बेलीचा फॉर्म आॅस्ट्रेलिया संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याला दोन डावांमध्ये अनुक्रमे १० व ५ धावा करता आल्या. निलंबनाच्या कारवाईमुळे त्याला होबार्टमध्ये इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळता आले नव्हते. यजमान संघाची भिस्त जॉन्सन व मिशेल स्टार्क यांच्या गोलंदाजीवर अवलंबून आहे
दुसऱ्या बाजूचा विचार करता श्रीलंकेमध्ये वन-डे मालिकेत ५-२ ने पराभव स्वीकारणारा इंग्लंड संघ या वेळी वेगळा भासत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर अॅलिस्टर कुकची कर्णधारपदावरून उचलबांगडी करीत संघाचे नेतृत्व इयोन मोर्गनकडे सोपविण्यात आले. आॅस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर इंग्लंड संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. इंग्लंडचे फलंदाज फॉर्मात असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: इयान बेलच्या बॅटमधून धावा निघत आहेत. त्याने सराव सामन्यांत चांगली कामगिरी केली होती. तिरंगी मालिकेत इंग्लंडला आॅस्ट्रेलियाविरुद्ध दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले, पण त्यांनी भारताविरुद्ध दोन्ही सामन्यांत विजय मिळविण्याचा पराक्रम केला.
ब्रिस्बेनमध्ये भारताविरुद्ध ९ गडी राखून विजय मिळविणाऱ्या इंग्लंडने शुक्रवारी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचा ३ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले. अंतिम लढतीत इंग्लंडपुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान आहे. या स्पर्धेत विजय मिळविणाऱ्या संघाला विश्वकप स्पर्धेत सहभागी होताना आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. (वृत्तसंस्था)