आॅस्ट्रेलियाने दिला कर्णधार क्लार्कला विजयाने निरोप
By Admin | Published: August 23, 2015 11:41 PM2015-08-23T23:41:47+5:302015-08-23T23:41:47+5:30
पावसाचा व्यत्यय आलेल्या अॅशेज मालिकेतील अखेरचा आणि पाचवा कसोटी सामना जिंकून आॅस्ट्रेलियाने त्यांचा कर्णधार मायकल क्लार्कला विजयी निरोप दिला
लंडन : पावसाचा व्यत्यय आलेल्या अॅशेज मालिकेतील अखेरचा आणि पाचवा कसोटी सामना जिंकून आॅस्ट्रेलियाने त्यांचा कर्णधार मायकल क्लार्कला विजयी निरोप दिला. आॅस्ट्रेलियाने अखेरच्या कसोटीत इंग्लंडवर एक डाव आणि ४६ धावांनी मात केली. स्टीव्हन स्मिथ सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
रविवारी आलेल्या पावसाच्या व्यत्ययात फॉलोआॅन घेऊन खेळणाऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव २८६ धावांत आटोपला. इंग्लंडतर्फे दुसऱ्या डावात अॅलेस्टर कुक याने सर्वाधिक ८५ धावा केल्या. बटलरने ४२, मोईन अलीने ३५ आणि बेअरस्टॉने २६ धावांचे योगदान दिले. आॅस्ट्रेलियाकडून पीटर सीडलने ३५ धावांत ४ गडी बाद केले. त्याला लियोन आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ दिली. या यशामुळे आॅस्ट्रेलियाने या कसोटी मालिकेनंतर निवृत्त होणारा त्यांचा कर्णधार मायकल क्लार्कला विजयी निरोप दिला. या सामन्यात इंग्लंडला पराभव पत्करावा लागला असला तरी ही प्रतिष्ठित अॅशेज मालिका त्यांनी ३-२ फरकाने जिंकली.
त्याआधी, फॉलोआॅननंतर इंग्लंडने रविवारी सुरुवातीला ६ बाद २0३ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. आॅस्ट्रेलियाने दुसऱ्याच षटकात नवीन चेंडू घेतला आणि मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या पीटर सीडलने नाईट वॉचमन मार्क वूड (६) याला पायचीत करीत संघाला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. कालचा नाबाद फलंदाज जोस बटलरदेखील ४२ धावा काढल्यानंतर मिशेल मार्शच्या चेंडूवर मिडआॅफवर स्टार्ककडे झेल देऊन तंबूत परतला. त्यामुळे इंग्लंडची स्थिती ८ बाद २२३ अशी झाली. ही बटलरची या मालिकेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. इंग्लंडची स्थिती ८ बाद २५८ अशी संकटात सापडल्यानंतर पावसाचे आगमन झाले आणि लवकरच उपाहारासाठी खेळ थांबविण्यात होता. त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर उपाहाराला १७ धावांवर खेळणारा मोईन अली (३५), स्टुअर्ट ब्रॉड (११) यांना बाद करीत पीटर सीडलने आॅस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक :
आॅस्ट्रेलिया : पहिला डाव ४८१. इंग्लंड : पहिला डाव १४९. दुसरा डाव १0१.४ षटकांत सर्वबाद २८६. (अॅलेस्टर कुक ८५, बटलर ४२, मोईन अली ३५, बेअरस्टॉ २६, पीटर सीडल ४/३५, मिशेल मार्श २/५६, लियोन २/५३, जॉन्सन १/६५, स्मिथ १/७).