आॅस्ट्रेलियाला आघाडी
By Admin | Published: March 5, 2017 05:19 PM2017-03-05T17:19:20+5:302017-03-06T00:10:51+5:30
यजमान भारतीय संघाने दिलेल्या 189 धावांचा पाठलाग करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या दिवसाखेर 6 बाद 237 धावा करत 48 धावांची आघाडी घेत सामन्यावर पकड मजबूत केली आहे.
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5 - सलामीवीर मॅट रेनशॉ व शॉन मार्श यांची झुंजार अर्धशतकी खेळी, भारताचे सुमार क्षेत्ररक्षण आणि डीआरएसच्या चुकीचा लाभ घेत आॅस्ट्रेलियाने रविवारी पहिल्या डावात आघाडी घेतली आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर वर्चस्व कायम राखले. आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २३७ धावांची मजल मारली. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८ धावांची आघाडी घेतली असून, त्यांच्या चार विकेट शिल्लक आहेत. पुणे कसोटीत ३३३ धावांनी पराभव स्वीकारणारा भारतीय संघाचा पहिला डाव १८९ धावांत संपुष्टात आला आहे.
सलामीवीर रेनशॉ (६०) आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शॉन मार्श (६६) यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारताचे दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्याविरुद्ध लढवय्या खेळी करीत आॅस्ट्रेलियाला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांनी भागीदारी केली. शॉनने त्यानंतर मॅथ्यू वेडसोबत (नाबाद २५) सहाव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. आजचा खेळ थांबला त्यावेळी वेडला मिशेल स्टार्क (१४) साथ देत होता.
भारतातर्फे जडेजा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १७ षटकांत ४९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. ईशांत शर्मा (१-३९), अश्विन (१-७५) व उमेश यादव (१-५७) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. स्टार आॅफ स्पिनर अश्विनने ४१ षटके गोलंदाजी केली. पण सकाळी आपल्या तिसऱ्या षटकात बळी घेतल्यानंतर तो दिवसभर बळी घेण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. दरम्यान, क्षेत्ररक्षकांचे गोलंदाजांना अपेक्षित सहकार्य लाभले नाही. भारताने काही सोपे झेल सोडले. याव्यतिरिक्त डीआरएसचा अचूक वापर करण्यात भारतीय संघ पुन्हा एकदा अपयशी ठरला.
आॅस्ट्रेलियाने कालच्या बिनबाद ४० धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या सत्रात आॅस्ट्रेलियाला २९ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ४७ धावांची भर घालता आली. आॅस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात डेव्हिड वॉर्नर (३३) व कर्णधार स्टीव्हन स्मिथ (६) हे दोन महत्त्वाचे फलंदाज गमावले. भारताने दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या तासात रेनशॉसह तीन बळी गमावले. या सत्रात आॅस्ट्रेलियाने ३५ षटके खेळताना ७६ धावा वसूल केल्या. शॉन मार्श तिसऱ्या सत्रात बाद होणारा एकमेव फलंदाज ठरला. आॅस्ट्रेलियाने या सत्रात २६ षटकात ७४ धावा केल्या. वॉर्नरला अश्विनने तर स्मिथला जडेजाने माघारी परतवले.
रेनशॉला यादवच्या गोलंदाजीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्लिपमध्ये जीवदान दिले. त्याचा लाभ घेत त्याने अर्धशतकी खेळी केली. रेनशॉची खेळी जडेजाने संपुष्टात आणली. जडेजाने त्यानंतर पीटर हँड््सकाम्बला (१६) तंबूचा मार्ग दाखवला. ईशांतने चहापानापूर्वी अखेरच्या चेंडूवर मिशेल मार्शला खाते उघडण्यापूर्वीच बाद केले.
शॉन मार्शला नशिबाचीही साथ लाभली. तो वैयक्तिक ४४ धावांवर असताना यादवच्या गोलंदाजीवर पंच इलिंगवर्थ यांनी त्याला बाद दिले होते, पण रिव्'ूमध्ये चेंडू उजव्या यष्टीबाहेर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भारताने शॉन मार्श व मॅथ्यू वेड यांच्याविरुद्ध डीआरएसचा आधार घेतला. पण दोन्ही वेळेत निर्णय चुकीचा ठरला. शॉन मार्शला यादवने तंबूचा मार्ग दाखवला. याच षटकात मिशेल स्टार्कचा उडालेला झेल यष्टिरक्षक साहाला टिपण्यात अपयश आले.
धावफलक
भारत पहिला डाव १८९.
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : डेव्हिड वॉर्नर त्रि.गो. अश्विन ३३, मॅट रेनशॉ यष्टिचित साहा गो. जडेजा ६०, स्टीव्ह स्मिथ झे. साहा गो. जडेजा ०८, शॉन मार्श झे. नायर गो. यादव ६६, पीटर हँड्सकाम्ब झे. अश्विन गो. जडेजा १६, मिशेल मार्श पायचित गो. ईशांत ००, मॅथ्यू वेड खेळत आहे २५, मिशेल स्टार्क खेळत आहे १४. अवांतर (१५). एकूण १०६ षटकांत ६ बाद २३७. बाद क्रम : १-५२, २-८२, ३-१३४, ४-१६०, ५-१६३, ६-२२०. गोलंदाजी : ईशांत शर्मा २३-६-३९-१, उमेश यादव २४-७-५७-१, अश्विन ४१-१०-७५-१, जडेजा १७-१-४९-३, नायर १-०-७-०.