भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व वॉर्नरकडे?
By admin | Published: December 13, 2015 11:23 PM2015-12-13T23:23:13+5:302015-12-13T23:23:13+5:30
आॅस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुढच्या वर्षी १२ जानेवारीपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दुखापतग्रस्त स्टिव्हन स्मिथच्या स्थानी
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुढच्या वर्षी १२ जानेवारीपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दुखापतग्रस्त स्टिव्हन स्मिथच्या स्थानी आॅस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषविण्याची शक्यता आहे.
भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद वॉर्नर सांभाळण्याची शक्यता आहे. गुडघा व पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला स्मिथ सध्या विंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळत आहे. पुढच्या कसोटी सामन्यातही त्याच्या खेळण्याबाबत काही अडचण नाही. पण निवड समिती व वैद्यकीय स्टाफ त्याला विश्रांती देण्याबाबत विचार करीत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आॅस्ट्रेलियन निवड समिती व वैद्यकीय स्टाफ स्मिथला भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान विश्रांती देण्याचा निर्णय घेऊ शकते. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेदरम्यान स्मिथ फिट असावा, असे संघव्यवस्थापनाला वाटते. बिग बॅश लीगच्या सुरुवातीच्या फेरीतील लढतींमध्येही स्मिथ खेळणार नाही. त्याला अॅशेस मालिकेदरम्यान गुडघा व पाठीच्या दुखापतीने सतावले होते.
आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक व निवडकर्ते डॅरेन लेहमन यांनीही स्मिथला काही कालावधीसाठी विश्रांती देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. लेहमन म्हणाले, ‘‘स्मिथ २६ वर्षांचा असल्याचे म्हणतो, पण होबार्टमध्ये त्याचा खेळ बघितल्यानंतर तो ३६ वर्षांचा भासत होता. कर्णधारपद सांभाळण्याचे दडपण मोठे असते. बीबीएलमध्ये तो खेळणार नाही. माझ्या मते, दोन आठवड्यांची विश्रांती पुरेशी ठरेल.’’
आॅस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक म्हणाले, ‘‘वन-डे मालिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर टी-२० विश्वकप स्पर्धा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ब्रेक दिसत नाही. मी डॉक्टर नाही.’’ आॅस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भारतीय संघ पाच वन-डे व तीन टी-२० सामने खेळणार आहे.(वृत्तसंस्था)