आॅस्ट्रेलियाकडून विंडीज पराभूत
By admin | Published: December 13, 2015 02:42 AM2015-12-13T02:42:32+5:302015-12-13T02:42:32+5:30
पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन याने भेदक मारा करीत आॅस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजवर एक डाव २१२ धावांनी
होबार्ट : पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन याने भेदक मारा करीत आॅस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजवर एक डाव २१२ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
गेल्या मार्चनंतर पहिली कसोटी खेळणाऱ्या पॅटिनसनने विंडीजच्या फलंदाजांना पाठोपाठ बाद केले. डेरेन ब्राव्होच्या शतकानंतरही (१०८) पहिल्या डावात विंडीजने केवळ २२३ धावांपर्यंतच मजल गाठल्याने आॅस्ट्रेलियाला ३६० धावांची आघाडी मिळाली. आॅस्ट्रेलियाने पहिला डाव ४ बाद ५८३ धावांवर घोषित केला. विंडीज संघ फॉलोआॅनच्या कात्रीत अडकल्यानंतर दुसऱ्या डावात या संघाची अवस्था आणखी बिकट होत गेली. दुसऱ्या डावात विंडीज संघ ३६.३ षटकांत १४८ धावा काढून बाद झाला. सलामीचा क्रेग ब्रेथवेट याने सर्वाधिक ९४ धावा केल्या; पण तो पराभव टाळू शकला नाही. पॅटिनसन याने २७ धावा देत ५ गडी बाद केले. हेजलवूड याने ४५ धावांत ४ गडी टिपले.
विश्व कसोटी क्रमवारीत विंडीज संघ केवळ बांगला देश आणि झिम्बाब्वेपेक्षा वर आहे. १९९७ नंतर हा संघ एकही कसोटी सामना जिंकू शकला नाही.
त्याआधी ब्राव्होने ९४ वरून पुढे सुरुवात करीत २० चौकारांसह ७ वे शतक गाठले. अखेरचा फलंदाज म्हणून बाद होण्याआधी १७७ चेंडूंचा सामना केला. हेजलवूडने सकाळी केमार रोच आणि जेरोम टेलर याला लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. दोन्ही डावांत विंडीजचे प्रत्येकी ९ गडी बाद झाले. वेगवान गोलंदाज शेनन गॅब्रियल जखमी झाल्यामुळे फलंदाजीला येऊ शकला नाही. हा समाना पाहण्यासाठी तीन दिवसांत केवळ १५,३४२ प्रेक्षकांची उपस्थिती दर्शविल्याने होबार्टच्या कसोटी स्थळाविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
आॅस्ट्रेलिया : पहिला डाव ५८३ घोषीत; वेस्ट इंडिज पहिला डाव २२३ सर्वबाद ; वेस्ट इंडिज दुसरा डाव : क्रेग ब्रेथवेट गो. हेझलवूड ९४, आर. चंद्रिका झे. स्मिथ गो.पॅटिन्सन ०, ड्वेन ब्रावो गो. पॅटिन्सन ४, मार्लोन सॅम्युअल्स झे. वॉर्नर गो पॅटिन्सन ३, जेरीमाईन ब्लॅकवूड गो. पॅन्टिन्सन ०, दिनेश रामदिन झे. वॉर्नर गो. मिशेल मार्श ४, जेसन होल्डर झे. नेव्हिल गो. पॅटिन्सन १७, केमार रोच झे. नेव्हिल गो. हेझलवूड ३, जेरोमी टेलर झे. पॅटिन्सन गो. हेझलवूड १२, जोमेल वॅरिक्कन नाबाद ६, अवांतर ५, एकूण ३६.३ षटकांत १४८ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२, २ -२०, ३-२४, ४-२४, ५-३०, ६-६०, ७-९१, ८-११७, ९-१४८ गोलंदाजी : जोश हेझलवूड १०.३-३-३३-३, जेम्स पॅटिन्सन ८-२-२७-५, पी.एम. सिडल ७-१-३४-०, मिशेल मार्श ७-०-३६-१, नॅथन लियॉन ४-०-१७-०