आॅस्ट्रेलियाची भारत दौऱ्याची तयारी दुबईत
By admin | Published: January 3, 2017 12:48 AM2017-01-03T00:48:59+5:302017-01-03T00:48:59+5:30
अलीकडच्या कालावधीतील भारताची चमकदार कामगिरी बघितल्यानंतर आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे
सिडनी : अलीकडच्या कालावधीतील भारताची चमकदार कामगिरी बघितल्यानंतर आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. आॅस्ट्रेलियाने भारत दौऱ्याच्या तयारीसाठी दुबईमध्ये उपखंडातील खेळपट्ट्यांवर सराव करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून भारताने सलग पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत. भारताने अलीकडेच वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांविरुद्ध मोठ्या फरकाने मालिका जिंकल्या आहेत. भारतात खेळल्या गेलेल्या आठ कसोटी सामन्यांपैकी विराटच्या नेतृत्वाखाली भारताने सात सामन्यांत विजय मिळविला आहे.
आॅस्ट्रेलियासाठी भारतात कसोटी विजय मिळविणे कठीण ठरले आहे. आॅस्ट्रेलियाला २००४ पासून भारतात एकही कसोटी सामना जिंंकता आलेला नाही. २०१३ च्या भारत दौऱ्यात त्यांना चार कसोटी सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आॅस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या दुबई येथील अकादमीमध्ये शिबिर आयोजित करण्यास इच्छुक आहे.
क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे हाय परफॉरमन्स मॅनेजर पॅट होवर्ड म्हणाले, ‘भारतात प्रत्येक ठिकाणी परिस्थिती समान नसते. आयसीसीने अलीकडच्या कालावधीत चांगले कार्य केले आहे. त्यांनी विविध शहरांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. त्यामुळे तेथे केवळ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्याच नाही तर विविध प्रकारच्या खेळपट्ट्या उपलब्ध आहेत. आम्हाला कुठल्या परिस्थितीला सामोरे जायचे आहे, त्याची नक्कल करता येणार नाही, पण केवळ परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करता येईल. ’
आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध मंगळवारपासून सिडनीमध्ये प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठी संघाची निवड करताना भारताविरुद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेवर लक्ष ठेवून केली आहे. या संघात नॅथन लियोन व स्टीव्ह ओ किफे अशा दोन फिरकीपटूंचा समावेश आहे. तिसरा फिरकीपटू एस्टन एगर १३ सदस्यांच्या संघाचा सदस्य होता, पण त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळवता आले नाही. भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान पहिला कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये खेळला जाणार आहे.
इंग्लंडकडून प्रेरणा
दुबईमध्ये सराव करण्यासाठी आॅस्ट्रेलियाने निश्चितपणे इंग्लंडकडून प्रेरणा घेतली असेल. त्यांनी २०१२ मध्ये भारत दौऱ्यापूवी दुबईमध्ये सराव केला होता. त्यावेळी इंग्लंडने २-१ ने मालिका जिंकली होती. त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजने गेल्या वर्षी भारतात विश्व टी-२० स्पर्धेत जेतेपद पटकावण्यापूर्वी आयसीसीच्या अकादमीमध्ये वेळ घालविला होता.