भारत दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलियाची तयारी सुरू
By Admin | Published: January 10, 2017 01:49 AM2017-01-10T01:49:41+5:302017-01-10T01:49:41+5:30
फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने (सीए) आतापासून तयारीला सुरुवात केली आहे.
सिडनी : फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने (सीए) आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. डावखुरा फिरकीपटू स्टीफन ओकिफीला लाल चेंडूने सराव करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्याला सध्या सुरू असलेल्या बिग बॅश टी-२० लीगमधून हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
आॅस्ट्रेलियाचा सिनिअर फिरकीपटू नॅथम लियोनसह ओकिफीचा सोमवारी मेलबोर्न रेनेगेड््सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी सिडनी सिक्सर्समध्ये समावेश होता; पण भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता हे खेळाडू पाचदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहेत. भारत दौऱ्यात ओकिफी व लियोन आॅस्ट्रेलियातर्फे मुख्य फिरकीपटूंची भूमिका बजावतील, अशी आशा आहे.
सीएचे कार्यकारी महाव्यवस्थापक (संघाची कामगिरी) पॅट होवार्ड यांच्या मते, ओकिफीला लाल चेंडूने सराव करण्याची अधिक गरज आहे.
होवार्ड म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या श्रीलंका दौऱ्यानंतर आम्ही भारत दौऱ्याच्या सर्वोत्तम तयारीसाठी क्रिकेट न्यू साऊथ वेल्स व स्टीव्हसोबत चर्चा करीत आहोत.’ त्याने म्हटले की, ‘अलीकडे झालेल्या दुखापतीमुळे मला शेफील्ड स्पर्धेत सहभागी होता आले नाही. भारत दौऱ्यासाठी असलेल्या संभाव्य खेळाडूंच्या तुलनेत मला लाल चेंडूने अधिक सराव करता आलेला नाही. ज्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळायचे आहे त्यासाठी त्या प्रकारच्या क्रिकेटचा अधिक सराव करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे.’
होवार्ड पुढे म्हणाले, ‘आता त्याचे लक्ष ग्रेड व फ्युचर्स लीग क्रिकेटवर केंद्रित झाले आहे. जानेवारीअखेर दुबईमध्ये भारत दौऱ्यासाठी होणाऱ्या सराव शिबिरात तो सहभागी होण्याची आशा आहे.’
आॅस्ट्रेलिया संघ भारतातील कसोटी कामगिरीत सुधारणा करण्यास उत्सुक आहे. आॅस्ट्रेलियाला गेल्या दौऱ्यात भारतात ४-०ने पराभव स्वीकारावा लागला होता. भारत दौऱ्यात आॅस्ट्रेलिया संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून, पहिली कसोटी २३ फेब्रुवारीपासून पुणे येथे खेळली जाणार आहे. (वृत्तसंस्था)
जम्पामध्ये कुंबळेची झलक : हसी
४अॅडम जम्पाच्या गोलंदाजीमुळे महान गोलंदाज अनिल कुंबळेची आठवण येते, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसीने व्यक्त केली. या युवा लेग स्पिनरने गेल्या वर्षी उपखंडामध्ये चमकदार कामगिरी करीत भारताच्या आगामी दौऱ्यासाठी स्वत:च्या निवडीचा दावा सादर केला आहे.
४जम्पाला भारतातील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेत त्याने आॅस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या साथीने तो राइजिंग पुणे सुपरजायन्ट्स संघातर्फे खेळला होता.
४आॅस्ट्रेलियातर्फे उपखंडात मर्यादित षटकांचे ११ सामने खेळणाऱ्या २४ वर्षीय जम्पाने १६.११ च्या सरासरीने १८ बळी घेतले आहेत.
हसी म्हणाला, ‘कुंबळे उंच चणीचा गोलंदाज होता; पण तो चेंडू अधिक वळवीत नव्हता. तो याच पद्धतीने यशस्वी ठरला. कुंबळे महान खेळाडू असून, त्यांच्यासोबत जम्पाची तुलना करणे घाईचे ठरेल. पण दोघांच्या गोलंदाजांची शैली बऱ्याचअंशी समान आहे. त्यामुळे त्याची तुलना करता येईल.’