आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला १५० धावांची आघाडी
By admin | Published: September 17, 2016 05:04 AM2016-09-17T05:04:53+5:302016-09-17T05:04:53+5:30
भारत ‘अ’ संघाच्या गोलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसऱ्या ‘कसोटी’ सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहिल्या डावात ५ बाद ३१९ धावांची मजल
ब्रिस्बेन : भारत ‘अ’ संघाच्या गोलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसऱ्या ‘कसोटी’ सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहिल्या डावात ५ बाद ३१९ धावांची मजल मारली आणि आपली बाजू मजबूत केली.
भारत ‘अ’ संघाचा डाव १६९ धावांत संपुष्टात आल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाची पहिल्या पाच षटकांत २ बाद ११ अशी अवस्था झाली होती. पण, त्यानंतर हिल्टन कार्टराईटच्या नाबाद ९९ धावांच्या खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दिवसअखेर १५० धावांची आघाडी घेतली होती. कार्टराईटने १५३ चेंडूंना सामोरे जाताना १४ चौकार व १ षटकार ठोकला. त्याला शनिवारी वैयक्तिक शतक झळकावण्याची संधी आहे. कार्टराईटने ब्यू व्हेबस्टरसोबत (७९) चौथ्या विकेटसाठी ४३.२ षटकांत १५२ धावांची भागीदारी करीत संघाला मजबूत स्थिती गाठून दिली. निक मेडिन्सनने ८१ धावांची शानदार खेळी केली. त्याआधी, कालच्या ९ बाद १६९ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारत ‘अ’ संघाला आज धावसंख्येत भर घालता आली नाही. पंड्या (७९) दिवसातील चौथ्या चेंडूवर केन रिचर्डसनच्या (४-३७) गोलंदाजीवर बाद झाला.
आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाची सुरुवात निराशाजनक झाली. शार्दूलने ट्रॅव्हिस डीन (०) आणि ज्यो बर्न्स (३) यांना झटपट माघारी परतवले. मेडिन्सन व कुर्टिस पॅटरसन (२५) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. मेडिन्सनने ११४ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार व २ षटकार ठोकले. पंड्याने पॅटरसनला यष्टिरक्षक ओझाकडे झेल देण्यास भाग
पाडले, तर जयंतने मेडिन्सनला
तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर कार्टराईट व व्हेबस्टर यांनी
भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ठाकूरने व्हेबस्टरला माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्याने १८६ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार ठोकले.
भारत ‘अ’ संघातर्फे वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने ७१ धावांत ३ बळी घेतले. हार्दिक पंड्या व जयंत यादव यांनी अनुक्रमे ३९ व ८० धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी एक बळी घेतला.